मुंबई: कोल्हापुरातील काँग्रेसचा विजय हा केवळ सहानुभूतीमुळे मिळाला आहे, त्यामुळे 2024 सालच्या निवडणुकीत ही जागा भाजपच जिंकणार असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नेशन टू सेव्ह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते, त्यावेळी ते बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष हा पहिल्या दिवसांपासून आपला बेस वाढवतोय. भाजप-शिवसेना एकत्र असताना जेवढी मतं मिळत होती त्यापेक्षा जास्त मतं ही भाजपला मिळाली आहेत. तीन पक्ष एकत्रित असतानाही भाजपला जास्त फायदा झाला आहे. काँग्रेसचा विजय हा सहानुभूतीमुळे झाला आहे. त्यामुळे 2024 साली या जागेवर भाजपचाच उमेदवार जिंकणार हा माझा विश्वास आहे."


हनुमान चाळीसा आम्ही शतकानुशतके म्हणत आलो आहोत. ज्यांना दुःख होत आहे त्यांचे कारण काही तरी वेगळ आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


कोरोना काळात राज्य सरकारकडून राजकारण
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जेव्हा ही महामारी आली तेव्हा पंतप्रधानांनी आधीच सांगितलं होतं की यामध्ये राजकारण करु नये. राज्यात आणि मुंबईत सर्वात मोठ्या संख्येने केसेस वाढत होत्या. पण यावेळी महाराष्ट्रात राजकारण झाले याचं दुःख आहे. जेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती होती तेव्हा राज्यात काही पक्षाच्या लोकांनी मजुरांना भडकवलं. केंद्राकडून मदत घेतली तरी केंद्रावर टीका केली."


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली. सर्व पैसे राज्य सरकार घेत होते पण केंद्राने मदत केली नाही अशी टीका करत होते. सर्वात जास्त पीपीई किट, ऑक्सिजन राज्याला केंद्राने दिले. केंद्राने राज्याला 1200 कोटी रुपये दिले पण त्यातले 600 कोटी राज्याने खर्च केले. यातही राजकारण करण्यात आलं."


महत्वाच्या बातम्या: