Sanjay Shirsat On BJP-Shiv Sena Alliance : भाजप-शिवसेनेची युती का तुटली यावरून राज्याच्या राजकारणात सतत वेगवेगळे दावे केले जातात. विशेष म्हणजे यावर दिल्लीची नेते देखील आपले मत मांडताना पाहायला मिळाले आहे. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ही युती कशी तुटली यावर भाष्य करत 2019 च्या निवडणुकीतील पडद्या मागील गोष्टीचा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री होणार होते, भाजपचा देखील त्यांना विरोध नव्हता. तसेच सत्तेत पन्नास-पन्नास टक्केचा वाटा असेही सर्वांना मान्य होते. पण काही लोकांनी उद्धव ठाकरेंचा गैरसमज करणारी माहिती देऊन त्यांची कानं भरली आणि युती तुटली असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. 


काय म्हणाले शिरसाट? 


संजय शिरसाट म्हणाले की, 2019 जेव्हा सर्व निवडणुका झाल्यात, त्यावेळी आम्हाला सर्वांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. यावेळी सर्वच आमदार त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी पहिलं मुख्यमंत्री पद कोणाला? हा विषय निघाला. परंतु, निवडणुकीतील भाषणं पाहिले तर पुढेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक सभेत वेळोवेळी उल्लेख झाला. असे असतांना पाहिले मुख्यमंत्री पद आम्हाला द्या, वाटल्यास मंत्रालयाच्या आवारात एका बोर्डवर कालावधी किती असेल असे आपण लिहू असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी दिला. दरम्यान, शिवसेनेचे अनेक नेते फडणवीस यांच्या संपर्कात होते आणि असे करून नका फडणवीस वारंवार सांगत होते. शेवटी मात्रोश्रीवरून निरोप गेला की, आम्ही साडेपाच वाजता निर्णय कळवतो. त्यानंतर 6 वाजता सांगतो, 7 वाजता सांगतो असे सर्व प्रकार घडत गेले आणि शेवटी फोन घेणं बंद केले. त्यावेळी युती तुटल्याचे चित्र आमच्यासमोर आले, असं शिरसाट म्हणाले. 


एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री होणार होते...


तर मातोश्रीवर बोलवण्यात आलेल्या बैठकीत आम्ही सर्वजण होतो. यावेळी सत्तेचं वाटप पन्नास-पन्नास टक्के करण्यावर सर्वजण सहमत होते. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते. शिंदे हे उद्या मुख्यमंत्री होणार म्हणून पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली होती. पण याचवेळी आमच्याच पक्षातील काहींनी शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पक्ष हातात घेतील असे उद्धव ठाकरे यांना सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नावाला त्यावेळी देखील भाजपचा विरोध नव्हता. मात्र, शिंदे मुख्यमंत्री झाल्यास उद्धव ठाकरेंचं वर्चस्वाला धक्का पोहचेल असे काही गैरसमज काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात घातला. या लोकांचा फक्त युती तोडण्याकडे कल होता. त्यामुळे युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादीसह काँग्रेससोबत युती केली, असल्याचं शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या:


ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण आठ दिवसांत जेलमध्ये जाणार; शिंदे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी