बीड (Beed) : जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात होत असलेल्या नोकर भरतीत भ्रष्टाचार (Scam) झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, या भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना निलंबित करण्याचे आदेश यापूर्वीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. 


बीडच्या लोखंडी सावरगाव या ठिकाणच्या रुग्णालयात आरोग्य भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं होतं, त्या कंपनीने यामध्ये गैरव्यवहार केल्याचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी त्या प्रणालीतील दोष समितीचा अहवाल सादर होणे आवश्यक असतं. मात्र, या पदभरती संदर्भात आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी लातूरचे आरोग्य परिमंडळ अधिकाऱ्यांनी समिती नेमली असून, या समितीच्या अहवाला पूर्वीच साबळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर आता या आरोग्य भरतीला स्थगिती देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


काय आहे प्रकरण? 


बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात सुरु असलेल्या नोकरभरतीमध्ये मोठ्याप्रमाणावर पैसे उकळले जात असल्याच्या चर्चा होत्या. यांसंदर्भात विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. तसेच, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लातूरचे आरोग्य परिमंडळ अधिकाऱ्यांनी समिती नेमण्यात देखील आली होती. मात्र, आता थेट भरतीच रद्द करण्यात आली आहे.  


आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयालाच सर्वसामन्यांकडून विरोध


समितीचा अहवाल येण्यापूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या निर्णयालाच सर्वसामन्यांकडून विरोध होत आहे. तर, एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा नाहक बळी दिला जात असल्याच्या भावना जनतेमधून व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयाविरोधात विविध संघटना सर्वसामान्य नागरिक आंदोलन देखील केले होते. सोबतच, बीडच्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांनी साबळे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयातच आंदोलन केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात बीडकर रस्त्यावर उतरणार; आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्हाभरातून संताप