Jitendra Awhad: ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकारावरुन जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) रोष व्यक्त करत ठाणे प्रशासनावर आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये (Thane Hospital) आत जाण्याचा रस्ता मोठा आहे, पण हॉस्पिटलच्या आतमधून बाहेर येण्याचा रस्ता फक्त वरती आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. या सर्व प्रकरणांनंतरही ठाण्याच्या प्रशासनाला जाग येत नसल्याची खंत आव्हाडांनी व्यक्त केली.


हॉस्पिटलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता


ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सेस कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, याची जबाबदारी कोणी स्वीकारणार की नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. गरीब लोक फक्त मरण्यासाठी जन्माला येतात का? असा संतप्त सवाल देखील आव्हाडांनी केला आहे.


गरिबाबद्दल थोडीशी आपुलकी ठेवा, मुख्यमंत्र्यांना आवाहन


ठाण्यात फक्त रंग-रंगोटी, लायटिंग करण्याचं काम झालं, त्यात 400-500 कोटी रुपये घातले असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महिनाभरात त्या लाईट्स बंद पडल्या तरी चालतील, त्यांची बिलं काढली की यांचं काम झालं, असंही ते म्हणाले. ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत हे आमचं भाग्य आहे, ठाण्याला एवढं मोठं पद मिळतं आणि प्रतिष्ठेचा माणूस मिळाला आहे, पण हृदयाच थोडं ममत्व, थोडी माया, गरिबाबद्दल थोडीशी आपुलकी असायला हवी, असा खोचक उपदेश आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला.


मुख्यमंत्र्यांचं शहर असून अपेक्षाभंग


यापूर्वी 10 ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. 5 मृत्यूंनंतर तरी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यायला हवी होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, पण त्या पूर्ण होत नसल्याची खंत आव्हाडांनी व्यक्त केली.


जितेंद्र आव्हाडांचा हॉस्पिटलच्या डीनवर संताप


मला जेव्हा-जेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येतात, तेव्हा लगेच मी हॉस्पिटलमध्ये येतो. पण माझ्या हातात प्रशासनाची चावी नाही, मला अधिकार असते तर लगेच डीनचे कानशिल लाल केले असते, असं म्हणत आव्हाडांनी संपूर्ण प्रकारावर आपला राग व्यक्त केला. बाजूला माणसं रडत असतात, सात तास बॉडी बेडवर पडलेली असते तरी डीनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत नसल्याचं आव्हाड म्हणाले. थोडी तरी माणुसकी दाखवा, असा सल्लाही त्यांनी दिला.


सविस्तर वाचा:


धक्कादायक! ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू