तुळजापूर : बंद मंदिरांवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली. शाहांच्या या नाराजीवर बोट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांच्या नाराजीनंतरही भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर कायम कसे असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. तुळजापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
स्वाभिमान असेल पदावर राहायचा की नाही याचा विचार करावा : शरद पवार
1957 पासून महाराष्ट्राचे सगळे राज्यपाल पाहिले. 1967 नंतरच्या राज्यपालांशी माझा थेट संबंधही आला. असं भाष्य करण्यासंबंधीची भूमिका कोणी दाखवली नव्हती. हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, तशीच मुख्यमंत्री या पदाचीही प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. ती प्रतिष्ठा राज्यपालांकडून ठेवली गेली नाही तर साहजिकच अस्वस्थता येतेच. एक चांगली गोष्ट आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्यांची कानउघाडणी केली. स्वाभिमान असेल तर त्यांनी या पदावर राहायचं की नाही हा विचार करावा. पण केंद्राच्या गृहमंत्र्यांनी जाहीरपणे टीकाटिप्पणी करुनही त्या पदावर राहणार असेल तर ठीक आहे.
राज्यपालांनी काही शब्द टाळायला हवे होते : अमित शाह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का, अशी विचारणा करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या पत्र वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच भाष्य केलं. एका खासगी वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "राज्यपालांचं पत्र मी वाचलं आहे. त्यांनी काही शब्द टाळले असते, तर बरं झालं असतं.
काय आहे प्रकरण?
राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली होती. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले होते.
राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे की, "आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्त्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?"
संबंधित बातम्या
- राज्यपालांनी ते शब्द टाळायला हवे होते : गृहमंत्री अमित शाह
- 'राज्यपालांचं वर्तन 'आ बैल मुझे मार', मोदी, शाहांनी त्यांना माघारी बोलवावं', शिवसेनेचा हल्लाबोल
- मुंबईला PoK म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना उत्तर
- राज्यपालांचं पत्र मीडियात प्रसिद्ध होणे आणि पत्रातील भाषा वाचून धक्का बसला, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र