मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का, अशी विचारणा करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पत्रावर मोदी सरकार आणि भाजपमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट झालं. राज्यपालांनी ते विशेष शब्द टाळायला हवे होते, असं खुद्द  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच म्हटलं आहे.


एका खासगी वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या पत्रवादावर प्रथमच भाष्य केलं. राज्यपालांचं पत्र मी वाचलं आहे. त्यांनी काही शब्द टाळले असते, तर बरं झालं असतं, असं शाह म्हणालेत. त्यांनी ते विशेष शब्द टाळायला हवे होते, असं गृहमंत्री यांनी म्हटलं.


काय आहे प्रकरण?


राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली होती. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले होते.


राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर


आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्त्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?