मुंबई : राज्यातील मंदिरं उघण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रातील मजकुरावरुन सर्वत्र चर्चा सुरु होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पत्रातील भाषेवरुन नाराजी व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्ष लिहिलं आहे.
शरद पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, राज्यपाल एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत मांडू शकतात हे मला मान्य आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे आपलं मत व्यक्त आहे, त्याचं स्वागत आहे. मात्र हे पत्र मीडियामध्ये प्रसिद्ध होणे आणि पत्रातील भाषा वाचून आपल्याला धक्का बसला आहे. पत्रात वापरण्यात आलेल्या अयोग्य भाषेची तुम्हीही दखल घेतली असेल याची खात्री आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जणू काही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिलं आहे असं वाटत आहे. लोकशाहीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुक्त संवाद झाला पाहिजे यावर माझा विश्वास आहे. मात्र मतं आणि भूमिका मांडताना पदाचा मान राखला गेला पाहिजे. घटनाक्रम पाहता मुख्यमंत्र्यांकडे आपलं उत्तर मीडियामध्ये प्रसिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांच्याशी मी चर्चा केलेली नाही. मात्र राज्यपालांच्या वागण्याने आपल्याला दुख: झाल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
राज्यपालांच्या मंदिरं उघण्याच्या मागणीबद्दल शरद पवारांनी म्हटलं की, सध्या सर्वजण कोरोना संकटाशी लढत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी तुम्ही अंतर ठेवण्यासंबंधी घोषणा दिली होती. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात ‘माझं घर माझं कुटुंब’ मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यातील जनतेला सोशल डिस्टन्सिंगबद्दल महत्त्व पटवून दिलं जात आहे. अशावेळी राज्यातील सिद्धिविनायक, विठ्ठल मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर अशा महत्त्वाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं.
राज्यपालांनी आपल्या पत्रात काय म्हटलं होतं?
जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशई संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.
11 ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय न पुढाऱ्यांचाही समावेश होता.
तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या 'सेक्युलर' शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो 'सेक्युलर' शब्द तुम्ही स्वीकारला आहे.
मी इथे नमूद करु इच्छितो की दिल्लीत 8 जून रोजी प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आली आहेत तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात अनेक ठिकाणी मंदिरं सुरु करण्यात आली होती. मंदिरं सुरु झाल्यानंतर तिथे कोविडचा प्रसार झाल्याचे आढळून आलेलं नाही. मी विनंती करतो की कोविड संसर्गाची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावीत. या पत्रासोबत मंदिरे सुरु करम्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्राप्त झालेली तीन प्रेझेन्टेशनही जोडत आहे.
Majha Vishesh | उघडे बार, बंद देवाचे द्वार, भगत चिडले, ठाकरेही नडले! माझा विशेष | मंदिरं आणि राजकारण