ठाणे : माणुसकीला काळिमा फासणारी घटना ठाण्यात समोर आली आहे. कॅन्सरग्रस्त महिलेच्या मृत्यूनंतर बिल रोख पाहिजे, कॅशलेस चालणार नाही, असं म्हणत रुग्णालयाने मृतदेह सकाळपर्यंत अडवला. त्यामुळे नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालाय.


ठाणे हेल्थ केअर रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्ण लता इंगळे यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण बिल भरल्यावरच मृतदेह ताब्यात मिळेल अशी भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली. 40 हजार रुपये रोख देऊन बाकीचे पैसे कार्डने देण्यासाठी तयार असतानाही रुग्णालयाने मृतदेह सकाळपर्यंत ताब्यात दिला नाही, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

या प्रकरणानंतर नौपाडा पोलिसांकडे या प्रकारची माहिती दिली. त्यानंतरही रुग्णालय रोख रकमेच्या मागणीसाठी ठाम राहिल्याने मृतकाच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला. पण हतबल असलेल्या नातेवाईकांकडे कोणताही पर्याय नव्हता. बँक उघडल्यावर रोख रक्कम काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र अशा पद्धतीने अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

कार्डने पैसे घेतले नाही आणि रोखीने पैसे मागितले हा आरोप बिनबुडाचा असल्याचा प्रतिदावा ठाणे हेल्थ केयरने केला आहे. आतापर्यंतच्या 1 लाख 80 हजारांच्या बिलापैकी 30 हजारांची सूट आम्ही दिली असून रुग्णाच्या नातेवाईकांनी 8 तारखेला 20 हजार रुपये कार्डने पेमेंट केल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय.

रुग्णालयात हा सर्व प्रकार होत असताना स्थानिक नेत्यांनीही मदत व्हावी, अशी विनंती केली. पण रुग्णालयाने आडमुठी भूमिका घेतली आणि रोख रकमेचा तिढा कायम ठेवला, असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे.

एकीकडे डॉक्टरांना मारहाण होते म्हणून डॉक्टर संपाचं हत्यार उपसतात. त्यांना सरकारकडून सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येते. पण अशा पद्धतीने रुग्णाच्या नातेवाईकांची पिळवणूक करताना कोणत्याही यंत्रणेचं लक्ष अशा मुजोर डॉक्टरांकडे का जात नाही, असा सवाल रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी केला आहे.