जळगाव : भुसावळ तालुक्यात जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीची झोपेत उशीने गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. 19 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडली असून दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलाशी प्रेमसंबंध असल्याने मुलीच्या आईवडिलांनी या मुलीचा हत्या केली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या आईवडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भुसावळ तालुक्यातील ही घटना असून मुलीला गावातील एका तरुणाने आपल्या जाळ्यात ओढले होते. यावरून दीड वर्षापूर्वी आई-वडिलांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन पोलिसात तक्रारही दिली. पोलिसांनी मुलीशी संबंध ठेवणाऱ्या युवकास ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात सादर केलं. कोर्टाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा युवक आपल्या मुलीच्या मागे लागल्याने अखेर या मुलीच्या वडिलांनी आपल्या समाजातील दुसरा मुलगा पाहून त्या मुलीचा विवाह करण्याचे ठरविले. मुलीचे वय साडेसतरा वर्ष असल्याने मुलीला जाळ्यात ओढणाऱ्या युवकाने याबाबत भुसावळ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. अल्पवयीन मुलीचा विवाह याविरोधात न्यायालयाने संबंधित मुलीच्या वडिलांना नोटीसही पाठवली. आपल्या मुलीची व आपली बदनामी होईल या कारणाने त्या मुलीच्या आईवडिलांनी एकोणावीस फेब्रुवारीच्या रात्री मुलगी गाढ झोपेत असताना उशीने नाक व तोंड दाबत स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली.


पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या चिंतन उपाध्यायला तूर्तास जामीन नाही

मुलीच्या हत्येनंतर आईवडिलांचा बनाव - 

हत्येनंतर दुसऱ्या दिवशी झोपेतील मुलगी उठत नाही, झोपेतच तिचा मृत्यू झाला असे कारण आई-वडीलांनी दिले. मात्र, याविषयी गावामध्ये कुजबुज चालू झाल्याने पोलीस पाटलांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शरीरावर काही संशयास्पद खुणा आढळल्या त्यावरून या मुलीचा मृतदेह जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात त्याकरता पाठविण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालात या मुलीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. त्यावर आपणच मुलीचा खून केल्याची कबुली मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांना दिली. मुलीला जाळ्यात ओढणाऱ्या युवकाने न्यायालयात तक्रार दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होऊ नये म्हणून मुलीला ठार मारल्याचे मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांना सांगितले.

Special Report | शीना बोरा हत्याकांडासंदर्भात गौप्यस्फोट, प्रकरणाची फाईल नव्याने ओपन होणार? | ABP Majha