मुंबई : रिपाई नेते रामदास आठवले (ramdas athavle) यांच्या लोकप्रियतेचे निकष तसे अनेक. राजकीय वर्तुळात आणि जनमानसातही आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रामदास आठवले यांना आज (25 December)ला सर्वच स्तरांतून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियावरही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये गाजतायेत त्या म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या शुभेच्छा.


अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आठवलेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या शुभेच्छा खुद्द आठवलेंच्याच शैलीत म्हणजेच एका कवितेच्या माध्यमातून दिल्या आहेत. या कवितेत देशमुखांनी रामदास आठवले यांचा उल्लेख 'राजकारणातील कवी दबंग' असा केला आहे.


''अनिल देशमुख कवितेत म्हणतात....
बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!''


देशमुखांनी कवितेची सुरुवातच सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीपासून केली आहे. पुढं त्यांनी न विसरता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीचाही उल्लेख या कवितेत केला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजकीय वर्तुळातीलच त्यांच्या सोबतीनं वाटचाल करणाऱ्या आठवलेंना दिलेल्या या शुभेच्छा सध्या अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणत आहे.





नाताळसण (christmas 2020) साधेपणानं साजरा करण्याबाबत देशमुख आग्रही


काही दिवसांपूर्वीच सरकारकडून नाताळसण साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं. खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच जनतेला अनुसरुन काही गोष्टी स्पष्ट केल्या. ज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळसण साजरा करत असताना चर्चमध्ये नेमकं कोणत्या नियमांचं पालन करावं आणि कशा प्रकारं या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहावं यासाठीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर केल्याचं वृत्त समोर आलं होतं.