Holi Festival 2024 :  देशभरात आज होळी (Holi 2024) हा सण साजरा केला जातोय. होळीचा सण दरवर्षी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. याच होळी सणाच्या (Holi Festival2024) पार्श्वभूमीवर अमरावतीतील (Amravati) मोझरी येथील युवती संवादच्या कार्यक्रमात महिला भगिनींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी केली आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या उपस्थितीत ही होळी पेटवण्यात आलीय.


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचारांच्या तोफा धडधडत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या मनातील भावना काँग्रेसच्या युवतीनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी महिलांनी होळीमध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून येणाऱ्या निवडणुकीत पुरोगामी विचारांच्या, संविधान रक्षणासाठी सतत जागृत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प केलाय. 


काँग्रेसने पेटवली सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी


देशभरात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून प्रचारांची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, गॅस सिलेंडर पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमती आणि संविधानाची मोडतोड करण्याचा सुरू असलेला प्रयत्न हा अन्यायकारी असल्याचे सांगत या विरोधात काँग्रेसच्या महिलांनी अन्यायकारी धोरणांची होळी जाळत आपला रोष व्यक्त केला आहे. युवती संवादच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यासह मोठ्या संख्येने युवती आणि महिला उपस्थित होत्या. 


आज पेटविली जाणार सैलानीची प्रसिद्ध 'नारळाची होळी'


देशभरात प्रसिद्ध असलेली सैलानी बाबांची यात्रा यावर्षी मोठ्या प्रमाणात भरली असून आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे. आज सैलानी बाबांच्या दर्गा परिसरात जवळपास दहा ट्रक नारळाची होळी केल्या जाते, या होळीसाठी देशभरातून लाखो भाविक सैलानीत दाखल झाले आहेत. आज दुपारी हा होलिकोत्सव होणार आहे. या यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने एक हजारावर पोलीस बंदोबस्त लावला असून एस.टी. महामंडळाने जवळपास साडे तीनशे विशेष बसेस सोडल्या आहेत.


देशभरातून लाखो सर्वधर्मीय भक्त सैलानीत दाखल 


बुलडाणा येथून जवळच प्रसिद्ध सैलानी तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून लाखो सर्वधर्मीय भक्त सैलानी येथे येत असतात. होळीच्या पहिल्या दिवसापासून याठिकाणी भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून लाखो भक्त सैलानीला येण्यास सुरुवात झाली आहे. बुलडाण्यातील एकमेव सर्वधर्मीय असे धार्मिक स्थान म्हणजे हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा होय. या दर्ग्याचे वैशिष्टे म्हणजे येथे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील आणि विदेशातील देखील भक्तगण येथे दर्शनाला येतात. बाबा सैलानीचे भक्तगण दरवर्षी ज्या क्षणाची प्रतीक्षा करता तो क्षण म्हणजे होळीचा दिवस. होळीच्या पहिल्या दिवसापासूनच हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गाला भव्य-दिव्य अशी यात्रा भरते. 


10 ट्रक नारळांची होळी


या यात्रेचे खास वैशिष्ट म्हणजे नारळांची होळी, जी पौर्णिमेच्‍या मुहूर्तावर पेटविण्यात येत असते. या प्रसंगी लाखो भाविक विविध जुनाट आणि मानसिक व्याधीतून मुक्ती मिळविण्यासाठी या होळीला हजेरी लावतात. नारळांची आगळीवेगळी होळी येथे पेटविली जाते. या होळी मध्ये जवळपास  10 ट्रक नारळांची होळी ही पेटवली जाते. यास जश्न-ए-उर्स शरीफ समारोह या नावाने देखील संबोधल्या जाते. सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये देशभरातून सुमारे 5 लाख भावीक दर्शनाला येतात. 


इतर महत्वाच्या बातम्या