Holi 2022 : कोकणात सण म्हटलं की, वेगवेगळ्या रूढी परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव (Shimgotsav). शिगमोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी परंपरा पहायला मिळतात. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा 'गिरोबा उत्सव'. सांगेली गावात महाशीवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जातं. होळीला हे झाडं तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करून पूजल जात. सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. कोकणात इतर मंदिरात दगडी पाषण असत मात्र सांगेली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषण बनवलं जातं. 




हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत्व मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जात. कोकणात शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पहायचा असेल तर सांगेलीत गेलंचं पाहिजे. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. सांगेली गाव म्हणजे निसर्गसंपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे. असा गाववासीयांचा विश्वास दृढ आहे.  गिरोबा या दैवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. यामुळे फणसाचे झाड कुठेही दिसले तरी देव भेटल्याप्रमाणे गावातील माणसे त्याला नमस्कार करतात. या गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवले जात नाही. या उत्सवात जिल्हावासीयांबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही भाविक दरवर्षी मोठय़ा संख्येने दाखल होत असतात. त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवाला पर्यटनाच्या दृष्टीने विचार करून प्रचार केल्यास रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे.


देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गात ग्रामीण संस्कृती पहायला, अनुभवायला येतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने ही एक पर्वणी ठरेल. त्यासोबत पर्यटनातून रोजगार निर्मिती सुध्दा होईल. त्यादृष्टीने कोकणातील शिमगोत्सवाकडे पाहिलं गेलं तर कोकणातील ग्रामीण संस्कृती पुढे येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :