हिंगोली: एसपी साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, आई एकीकडे तर मी आणि वडील एकीकडे उपचार घेत आहोत. उपचारासाठी एक रुपयाही नाही आणि कुणी बघायला तयार नाही. त्यामुळे मी छतावरून उडी मारून जीव देतोय. कोरोनाने हतबल झालेल्या हिंगोलीतील पोलीस कर्मचाऱ्याने अशी आपली एक ऑडिओ क्लिप केली होती. त्या कर्मचाऱ्याचा आज अखेर मृत्यू झाला. थेट पोलीस अधीक्षकांना उद्देशून केलेल्या या क्लिपमध्ये त्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याचंही सांगितलं होतं.


हिंगोली येथील गोरेगाव पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या सचिन इंगोले यांना अस्थमाचा त्रास होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची आई आणि वडील यांनाही कोरोना झाला होता. मात्र त्यांना उपचार व्यवस्थित मिळत नव्हते. त्यामुळे हतबल होऊन इंगोले यांनी थेट पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना उद्देशून एक ऑडिओ क्लिप केली होती, ज्यात त्यांनी आपल्या परिस्थितीचे कथन केलं. वारंवार मदतीसाठी कॉल करूनही उपचारासाठी काहीही हालचाली होत नसल्याने थेट छतावरून उडी मारून आत्महत्या करतोय असे इंगोले यांनी सांगितलं होतं. त्यांची ती ऑडिओ क्लिप चांगलीच वायरल झाली होती.अखेर त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फ्रंटलाईन कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची अवस्था काय आहे हे दिसून येतंय.


त्यांना आम्ही तात्काळ आयसीयूमध्ये दाखल केलं होतं परंतु अस्थमाचा त्रास असल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांच्या उपचाराकडे आम्ही लक्ष देत आहोत, पण दुर्दैवाने आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला वाचवू शकलो नाही अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासगर यांनी दिलीय.


या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय? 
"मा. एसपी साहेब तात्काळ मदत मागता मागता मला जीव देण्याची वेळ आलेली आहे. तरी पण मला तात्काळ मदत मिळत नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असून माझे वडील माझ्यासोबत बिमार आहेत, माझी आई तिकडं बिमार आहे आणि एक रुपयाही जवळ नाही. मदत तर राहिलीच, कोणी येऊन बघायला पण तयार नाही.अस्थमाच ट्रिटमेंट मिळणं आवश्यक असताना दुसरीच ट्रिटमेंट दिली जात आहे. आपल्याला इतके कॉल करूनसुद्धा फक्त यायलेत कोणी तरी येतो म्हणायलय आणि कोणीच येईन.त्याच्यापेक्षा मी माझा जीव टेरेसवून उडी टाकून देत आहे".


महत्वाच्या बातम्या :