हिंगोली : दिवसेंदिवस वाढत्या अपघातांमुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजी गावातील एका आजोबा अपघाताच्या भीतीपोटी घोड्यावरुन प्रवास करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
घोड्यावरुन प्रवास करणारे 65 वर्षीय भिकाजी गोरे संपूर्ण जिल्हात प्रसिद्ध आहेत. गोरे काकांना बालपणापासूनच पशुपालनाचा छंद आहे. त्यांच्याकडे सध्या नऊ ते दहा घोडे आणि बैलांची जोडी देखील आहे. गोरे काकांना दुचाकी चालवता येते पण अपघाताच्या भीतीमुळे ते घोड्यांना प्रवास करण्यास पसंती देतात.
गेल्या अनेक वर्षापासून गोरे काका घोड्यावरुन प्रवास करत आहेत. घोड्यावरून प्रवास केल्याने शारीरिक व्यायाम होतो आणि मला बालपणापासूनच घोडेस्वारीचा छंद आहे, असंही गोरे काका सांगतात.
दिवसेंदिवस होणारे अपघात आणि प्रदूषण तर मी रोखू शकत नाही. मात्र प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात घेता माझ्यापरीने ते टाळण्यासाठीही मी घोड्यावरुन प्रवास करत असल्याचं गोरे काका सांगतात.
अनकेदा नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी सरकार आणि विविध सामाजिक संस्थाकडून अनेक प्रयत्न केले जातात.