मुंबई : वडिलांच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून आसाममधील 'लंका' येथे राष्ट्रीय महामार्गानं जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला दिली आहे. सध्या देशातील सर्व विमान सेवा बंद असल्याने महामार्गाचा एकमेव पर्याय केंद्र सरकारकडून याचिकादाराला उपलब्ध करण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे विमान, रेल्वे आणि महामार्गदेखील वाहतुकीसाठी बंद आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात राहणाऱ्या बिन्नी धोलानी यांनी आसाममध्ये जाण्याची परवानगी आणि व्यवस्था करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाकडे केली होती. धोलानी यांच्या वडिलांचं 5 एप्रिल रोजी हृदय विकारानं निधन झाले आहे. आसाममध्ये वडिलांच्या अंतिम विधीसाठी उपस्थित राहण्यासाठी एखादे खासगी विमान किंवा व्यावसायिक विमान उपलब्ध करण्याची मागणी याचिकादाराने कोर्टाकडे केली होती.
न्यायमूर्ती ए. के. मेनन यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी कोर्टाला सांगितलं की, केवळ याचिकादारचं नाही तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या अनेक नातेवाईकाकडूनं किंवा निकटवर्तीयांकडूनही अशा मागण्या केल्या जात आहेत. मात्र सध्या देशभरातील रेल्वे आणि विमान सेवा पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे त्याची परवानगी याचिकादाराला मिळणार नाही. परंतु त्याची इच्छा असल्यास त्यांना रस्त्यानं तिथपर्यंत जाण्याची परवानगी आणि व्यवस्था केली जाईल, असे सिंह यांनी केंद्र सरकारच्यावतीनं स्पष्ट केले. हायकोर्टानं याची दखल घेत तशा प्रकारचा अर्ज करण्याचे निर्देश याचिकादाराला दिले आहेत. त्याचबरोबर जाण्याचा सविस्तर मार्गही दाखल करावा जेणेकरून आंतरराज्य सीमेवर त्याला अडचण येणार नाही, असेही निर्देश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
मास्क न वापरता फिराल तर जेलची हवा खाल, मुंबई महापालिकेचं परिपत्रक