मुंबई : सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आता मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बंधनकारक करण्यात आलं आहे.जर कुणी विना मास्क घालता आढळलं तर आता अटकेची कारवाई होणार आहे. वैयक्तिक, कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रकारचे आदेश असलेलं परिपत्रक महापालिकेनं काढलं आहे.  कोरोनाबाधितांची संख्या राज्यभरात वाढत आहे. त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. असं असतानाही काही ठिकाणी गर्दी होताना तसेच लोक मास्क वापरत नसल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटात देखील काहीजण गंभीर नसल्याचं दिसून आल्यानं अखेर महापालिकेला नागरिकांच्या काळजीपोटी हा निर्णय घ्यावा लागला आहे.


घराबाहेर पडताय तर मास्क वापराच, मात्र छत्रीसारखे नको : मुख्यमंत्री

रस्त्यावर, मार्केट, हॉस्पिटल, ऑफिस कुठेही जाणाऱ्या लोकांनी मास्क वापरावे. खासगी किंवा ऑफिसच्या वाहनात फिरणाऱ्या लोकांनी मास्क वापरावा तसेच कोणतीही बैठक तसेच कार्यालयात उपस्थित राहताना मास्क वापरावा, असे आदेश यात देण्यात आले आहेत. जे लोक या आदेशाला जुमानणार नाहीत, जे लोक हे नियम पाळणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे. यासाठी विकत आणलेला मास्क तर चालेलच शिवाय चांगला घरगुती मास्कही चालेल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

राज्यभरात 'फिव्हर क्लिनिक्स', कोरोनाशी लढण्यासाठी दवाखान्यांची विभागणी करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या संबोधनात मास्क वापरण्याविषयी सूचना दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री अंतर राखून बसले होते, प्रत्येकाने चेहऱ्याला मास्क लावले होते. हे सोशल डिस्टन्सिंग आम्ही पाळतो,  तुम्हीही पाळा, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर जातांना गर्दी करू नका तसेच घरगुती स्वरूपात तयार केलेले मास्क लावूनच बाहेर जा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे.

ते म्हणाले की, एकाचा मास्क दुसऱ्यांनी वापरु नये, वापरलेला साधा कपड्याचा मास्क गरम पाण्यात धुवून कडक वाळवून पुन्हा वापरावा, जे रेडिमेड मास्क वापरतील त्यांनी त्याची विल्हेवाट काळजीपूर्वक लावावी, सुरक्षित जागा पाहून हे मास्क जाळावेत व त्याची राख सुरक्षितपणेच फेकावी, म्हणजे विषाणुचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.