कोल्हापूर : बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा खटला येत्या वर्षभरात निकाली काढा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा 'एबीपी माझा'ने उलगडा केलं होतं. आता बरोबर एक वर्षानंतर याच दिवशी न्यायालयाने हा खटला एका वर्षात निकाली काढा, असा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी दिली आहे.
"या आदेशाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने दडपला जाणाऱ्या खटल्याला एक नवी दिशा मिळाली आहे," असं राजीव गोरे म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे या मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्विनी बिद्रे यांची अमानुषपणे हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास 2016 पासून सुरु झाला. मात्र आरोपी वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी या खून प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं होतं.
मागील वर्षी एबीपी माझाने अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि पोलिसांनी नाईलाजाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं. मात्र त्यानंतर या तपासामध्ये पुन्हा पोलिसांनी दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती.
या संदर्भात बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या खटल्याला गती देण्याची विनंती केली होती. मात्र राज्य शासन आणि पोलीस दलाने या तपासाकडे दुर्लक्ष केलं होतं.
यानंतर अश्विनी बिद्रे खून खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली होती. आज एक वर्षानंतर न्यायालयाने या खून खटल्याचा गांभीर्याने विचार करुन अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा खटला एका वर्षात निकाली काढावा, असा आदेश दिला आहे.
काय प्रकरण आहे?
15 एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
अश्विनी जयकुमार बिद्रे 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.
पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.
अश्विनी आणि अभय यांच्यात वाद
यानंतर अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.
अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदकरने भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर तात्काळ रजेवर गेला. दरम्यान, अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
संबंधित बातम्या
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : वस्तूंची पुन्हा खाजगी लॅबमधून तपासणी
अश्विनी बिद्रे हत्या : वस्तूंची पुन्हा फॉरेन्सिक तपासणी करणार
अश्विनी बिद्रे हत्या : खडसेंच्या भाच्याचा जामीन फेटाळला
अश्विनी बिद्रे हत्या : चॅटिंगमधील एका अक्षरामुळे कुरुंदकरचा गेम ओव्हर
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : मुख्य आरोपीचे पदोन्नतीच्या यादीत नाव
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : पहिल्या दिवशी निराशा, शोधमोहीम सुरुच
डोक्यात बॅट घालून अश्विनी बिद्रेंची हत्या, आरोपी कुरुंदकरच्या मित्राची कबुली
अश्विनी बिद्रेंचे अवशेष असलेल्या पेटीसाठी वसई खाडीत शोधमोहीम
अश्विनी बिद्रे हत्येचा खटला एका वर्षात निकाली काढा : हायकोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2018 03:27 PM (IST)
"या आदेशाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने दडपला जाणाऱ्या खटल्याला एक नवी दिशा मिळाली आहे," असं राजीव गोरे म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -