नागपूर : पंडित जवाहरलाल नेहरु यांंच्या जयंतीनिमित्त देशभरात 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातही  बालदिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. कारागृह प्रशासनानं आज विशेष गळाभेट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बालदिनानिमित्तची आगळीवेगळी गळाभेट कारागृहात शिक्षा भोगणारे बाप आणि बापाविना जगणारी त्यांची मुलं यांच्यात होती.


बाप-मुलांच्या नात्यांच्या भावना लक्षात घेत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहानं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या उपक्रमात 16 वर्षांपर्यंतच्या बालकांना आपल्या वडिलांना भेटण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी शिक्षा भोगणाऱ्या अनेक कैद्यांना आपल्या चिमुकल्यांना पाहून अश्रू अनावर झाले. त्यामुळे कारागृहातील वातावरण भावूक झालं होतं.


नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून शेकडो बालक तुरुंगात असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते. या सर्व चिमुकल्यांनी तुरुंगात जाऊन फक्त आपल्या वडिलांची भेट घेतली नाही, तर रोज जे शक्य होत नाही अशी वडिलांच्या प्रेमाची ऊब अनुभवली. कुणी वडिलांच्या कुशीत विसावला, कुणी वडिलांचा पापा घेतला, कुणी वडिलांच्या स्पर्शाने सुखावला तर कुणी थेट वडिलांच्या मांडीवर बसून काही क्षणासाठीच का होईना आपलं बालपण अनुभवलं.


बालदिनी अशी बाप-मुलांची भेट करून दिल्याने सर्वच बालकांनी तुरुंग प्रशासनाचे आभार मानले. अशी भेट घडवल्याने कैद्यांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होईल. जेणेकरुन शिक्षा पूर्ण केल्यानंतर पुन्हा गुन्ह्यांकडे वळण्याऐवजी कुटुंबाकडे परतण्याची प्रेरणा कैद्यांच्या मनामध्ये निर्माण होण्यास मदत होईल. या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, असं जेल प्रशासनानं सांगितलं.