Wardha rain Effect on Poultry : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधील खुबगाव शेतशिवारात आसोलकर भावंडांचा अनेक वर्षांपासूनचा कुक्कुटपालनाचा (Poultry Business) व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये एकूण 5 हजार 300 कोंबड्या होत्या. त्यापैकी तब्बल 4 हजार 500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याला धक्काच बसला असून तो पुरता हवालदिल झाला आहे. आर्वी तालुक्यात सोमवारी रात्रीपासून जोरदार सततधार पाऊस असल्याने अनेकांचे नुकसान झाले. परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं या कुक्कुटपालनामधील तब्बल 4500 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.  मोठं आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडलीय. हेमंत आसोलकर आणि गजानन आसोलकर यांचं हे पोल्ट्री फार्म आहे. तब्बल 4500 कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने या शेतकऱ्याचं दहा ते बारा लाखांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


दोन दिवसांपासूत पावसाची संततधार
आर्वी तालुक्यात दोन दिवसापासून संततधार पाऊस झाला. मुसळधार पाऊस बरसल्याने कोणीही घराबाहेर पडणं शक्य नव्हतं. त्यामुळे काहीसा पाऊस थांबल्यानंतर कुक्कुट पालक आसोलकर यांनी शेताकडे जात कोंबड्यांकडे बघितलं असता कुक्कुटपालनाच्या संरक्षण कठड्यावरील पडदे पावसामुळे फाटलेले दिसून आले. आत जाऊन बघितले असता त्यांना मोठा धक्काच बसला. तब्बल 4 हजार 500 कोंबड्यांचा खच दिसला. कुक्कुटपालनाच्या संरक्षण कठड्यांतून आत पावसाचे पाणी थेट शिरल्याने हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.


कर्ज काढून सुरू केला होता कुक्कुटपालन व्यवसाय
गजानन आसोलकर आणि हेमंत आसुलकर या दोन भावंडांनी मिळून खूबगाव येथे पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी कर्जही काढलं. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय निर्विघ्नपणे सुरू होता. मात्र यंदा आर्वी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी या पावसाचा फटका बसलेला आहे. या कोंबड्यांना देखील जोरदार पावसामुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलीच आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. जवळजवळ दहा ते बारा लाखांचा माल कुक्कुटपालनामध्ये होता असं शेतकऱ्याने सांगितलं आहे. अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट देण्यात पंचनामा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र अद्याप अधिकारी येथे पोहोचलेले नाहीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :