Maharashtra Rain Update: काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा (Rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूरसह एकूण 17 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र रविवार (16 जुलै) पासून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. 






मराठवाडा आणि विदर्भातही हजेरी लावणार 


मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर वाऱ्याचा वेगही राहणार असल्याचं हवमान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा मराठवाड्याला देण्यात आला आहे. विदर्भातही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. 


पश्चिम किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा


मुसळधार पावसामुळे  कोकण आणि गोवा परिसरात फ्लॅश फ्लडची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. सध्या समुद्र  खवळलेला असून वाऱ्यांचा वेग ताशी 45 ते 55 किमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागातील  मच्छिमारांना  समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 


भारतीय हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. घाट परिसरात सध्या पर्यटकांची रेलचेल सुरु आहे. पण घाटमाथ्यावरही पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असते.त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.  


हे ही वाचा :