नागपूर: नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं आहे. आता सोमवारी कामकाज होणार आहे.
इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे. पावसामुळे नागपुरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसारखीच परिस्थिती नागपूरमध्ये घडली आहे.
विधानसभेचं कामकाज 10 वाजता सुरु झालं. मात्र वीज नसल्याने अंधारातच कामकाज सुरु झालं. विरोधकांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सरकारविरोधात निदर्शने केली. नागपुरातील या परिस्थितीवरुन शिवसेनेने नागपूर महापालिका आणि प्रशासन म्हणजेच भाजपवर तुफान टीकास्त्र सोडलं.
तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला धारेवर धरलं. अडीच तास पाऊस पडल्यानंतर जर व्यवस्था कोसळत असेल, तर हे सरकार महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.
यंदा पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूरला घेण्यात आलं आहे. मात्र सरकारने आणि प्रशासनाने त्याची तयारी केली नाही. अधिवेशन नागपुरात घ्यावं की नाही, याबाबतचा जो अहवाल सादर कऱण्यात आला होता, त्यामध्ये सचिवांनी शंका उपस्थित केली होती. मोठा पाऊस पडला तर परिणाम होईल. तरीही अधिवेशन नागपुरात घेण्याचा हट्ट सरकारने घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
शिवसेनेची प्रतिक्रिया
"नागपुरात रस्त्यांरस्त्यात पाणी आहे. आमदारांना विधीमंडळात पोहोचण्यासाठी 2-2 तास लागले. हाच प्रकार मुंबईत झाला असता, तर मुंबई महापालिकेबद्दल लोकांनी आक्षेप घेतला असता. आज नागपुरात हा प्रकार घडला. नागपूर उपराजधानी आहे. नागपूरमध्ये अधिवेशन असताना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधीमंडळ सभागृहात वीजपुरवठा करताना शॉर्ट सर्किट होतंय, रस्ते भरले आहेत, मग नागपूर महापालिका काय करते, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला.
ऊर्जामंत्र्यांची प्रतिक्रिया
दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुठेही वीज गेली नसल्याचा दावा केला. पावसाने पाणी साचलं आहे. विधानभवनाचं स्वीचिंग सेंटर खाली आहे. पावसाचं पाणी आतमध्ये आल्याने स्वीचिंग सेंटर बंद करावं लागणार आहे. पाणी ओसरत नाही तोपर्यंत वीज बंद करावी लागणार आहे. लाईट कुठेही गेली नाही, केवळ स्वीचिंग सेंटरमुळे बंद केली, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
अजित पवार यांची प्रतिक्रिया
या सरकारच्या हट्टीपणामुळे ही परिस्थिती आली आहे. आज आम्ही सकाळपासून विधीमंडळात आहे. कुठेही लाईट नाही. लॉबीमध्ये अंधार झाला आहे. इथं अधिवेशन घेत असताना, जी पूर्वतयारी करायला हवी, जी काळजी घ्यायला हवी, ती घेतलेली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला.
नागपुरात तुफान पाऊस, विधानभवनात वीज गायब, मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2018 10:31 AM (IST)
नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -