अहमदनगर : दुसर्या लग्नासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी पतीने आपल्याला एड्स झाल्याचा कांगावा केला. मात्र पत्नीच्या चातुर्यामुळे पतीदेव लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकले.
सबंधित महिला आणि तिचा पती 2013 पासून विभक्त राहतात. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी पतीनं एक शक्कल लढवली.
एप्रिल महिन्यात पतीनं आपल्याला एड्स झाल्याचं पत्नी आणि तिच्या वडिलांना सांगितलं. विशेष म्हणजे एका नामांकित रुग्णालयाचं प्रमाणपत्रही पुरावा म्हणून दाखवलं.
माझ्यामुळे पत्नीला एड्सची बाधा होईल आणि त्याचा मुलाच्या भवितव्यावर परिणाम होईल, अशी भीती त्याने महिलेच्या वडिलांना घातली. पतीला एड्स असल्यानं घटस्फोटाची मागणी करण्याचा सल्ला पत्नीला दिला. त्यानुसार पत्नीनं न्यायालयात घटस्फोटासाठी दावाही दाखल केला.
पत्नीला भावनांमध्ये गुंडाळत पतीने आपली 25 लाखाची एक वर्षाची विमा पॉलिसी काढण्याचं आश्वासन दिलं. आपल्या पश्चात पत्नी आणि मुलाला वारस करुन पैसे देण्याची बतावणी केली. त्यानुसार त्याने पॉलिसी काढली मात्र त्याचे पुढील हप्ते काही भरले नाहीत.
सासूने दीड गुंठा जमीन सुनेला खरेदी खत करुन देण्याचं आश्वासन दिलं, मात्र या बदल्यात स्थावर आणि जंगम मालमत्तेचा लाभ मिळणार नसल्याचं लिहून घेतलं. यानंतर संशय बळावल्यानं पत्नीनं एड्स प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र तिला पुन्हा प्रमाणपत्र दाखवलं नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीने फिर्याद दाखल केली.
लग्नासाठी वाट्टेल ते करण्याच्या या उद्योगानं पती मात्र चांगलाच चर्चेत आला. या प्रकरणी पतीनं दाखवलेल्या रुग्णालयाच्या एड्स प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबतचा तपास करण्यात येणार आहे.
एड्स बाधित रुग्णाची ओळख कधीच जाहीर केली जात नाही. समाजातील हेळसांड आणि अवहेलना टाळण्यासाठी संबंधिताचं नाव गुप्त ठेवलं जातं. त्यामुळे तसं प्रमाणपत्रही दिलं जात नसल्याचं जाणकारांनी सांगितलं. त्यामुळे पतीनं घटस्फोटासाठी बनाव रचल्याचं उघड झालं.
पतीची अशी ही बनवाबनवी लक्षात आल्यानं पत्नीने त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पती आणि सासू विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.