मुंबई : राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, अकोल्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने निर्गुणा नदीला पूर आला आहे. हिंगोलीची कयाधू नदीही ओसांडून वाहत आहे. परिणामी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पातूर तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस..
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ढगफुटीसदृष्य पाऊस झालाय. या पावसामुळे पातूर तालुक्यातील अंधारसांगवी, चोंढी, खानापूर परिसरात मोठे नुकसान झालंय. काल संध्याकाळी चोंढी परिसरात निर्गुणा नदीच्या पुरात 25 जनावरे वाहून गेली होती. मात्र, सुदैवानं ही सारीच जनावरं पुरातून बाहेर निघाल्यानं वाचलीत. तर पातूर शहरालगतच्या खानापूर गावात नाल्याच्या पुराचे पाणी घुसल्याने गावाला अक्षरश: तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होतेय. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेत. 153.49 घनमीटर/प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरूय. तर तेल्हारा तालुक्यातील वारी येथील वान प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडलेत. 53.21 घनमीटर/प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरूय.
हिंगोलीत कयाधू नदीला पूर
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. उमरा ते बोर्डा रोडवरील कयाधू नदी पावसाच्या पाण्यामुळे काठोकाठ भरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे प्रवासी सुद्धा या नदीच्या पुराचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तर काल जिल्हाभरात वेगवेगळ्या घटना मध्ये 3 जण पाण्यात वाहून गेले आहेत तर दोनजण पुरातून बाहेर काढले आहेत. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आसून प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला अंकुर फुटले आहेत.
नांदगाव तालुक्यात पावसाची सरासरी ओलंडली
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने तालुक्याने यंदा पावसाची सरासरी ओलंडली आहे. आजही दुपारनंतर तालुक्यातील सोयगाव, भालूर, लक्ष्मीनगर, मांडवड या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचलंय. सतत पडणाऱ्या पावसाने कांदा, मका, कांदारोप, कापूस या पिकांना त्याचा फटका बसलाय तर अनेक ठिकाणचे छोटे, मोठे पाझर तलाव तुडूंब भरुन वाहतायत.
बीड जिल्ह्यात मांजरा धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू
काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले होते. अतिपावसामुळे आधीच शेतीचे नुकसान झाले असताना धरणातून पाणी सोडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे दरवाजे केवळ 0.25 मीटर उंचीपर्यंत उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री मांजरा धरणाच्या वरच्या भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि धरणात 35 हजार 893 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने धरणाचे सहा दरवाजे टप्प्याटप्प्याने दोन मीटर पर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यातून नदीपात्रात सध्या 35 हजार 968 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.