कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पावसाचं थैमान अजूनही सुरुच आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने सर्व विक्रम मोडित काढले आहेत. कोल्हापुरातील सर्व नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. इतकंच नाही तर पुणे-बंगळूरु महामार्गावरील वाहतूकही बंद झाली आहे. परिणामी कोल्हापूर शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.


पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यात महापूर आला आहे. अनेक ठिकाणी छातीभर पाणी साचलं आहे. पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. मात्र व्हीनस कॉर्नर परिसरात दवाखान्यातून रुग्णांना बाहेर काढताना बोट उलटली. यावेळी बोटीत तीन महिलांसह चार जण होते. वाचवताना बोट उलटल्याने सगळेजण खाली पडले. सुदैवाने बोटीमधील सगळ्यांना वाचवण्यात आलं आहे.



पूरस्थिती एवढी भीषण आहे की, पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदाच नौदलाला बोलवावं लागलं आहे. नौदलाच्या रेस्क्यू ऑपरेशनला वेग आला आहे. यात जवळपास 204 गावातील 51 हजार 785 नागरिकांचं स्थलांतर करण्यात यश आलं आहे. यासाठी नौदलाच्या दोन विमानांमधून 22 जणांचं पथक कार्यरत होतं. तसंच एअर लिफ्टिंगसाठी गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

एकीकडे महापुरामध्ये जिल्हा जलमय झाला असला तरी कोल्हापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उपसा केंद्रामध्ये पाणी भरलं आहे. त्यामुळे शक्य तिथे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. गेले तीन दिवस बऱ्याच ठिकाणी नागरिकांना पाणी पुरवठा झाला नाही.

कोल्हापुरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अशावेळी एक रुग्णवाहिका या पाण्यातूनही वाट काढताना पाहायला मिळाली. जवळपास पाच फूट पाण्यामधून या रुग्णवाहिकेने वाट काढली. एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकाने दाखवलेलं धाडसाचं सगळ्यांनीच कौतुक केलं.

सातारा-सांगलीलाही झोडपलं

दुसरीकडे सांगलीतही मुसळधार पाऊस बरसत आहे. शहरातील मारुती चौक, टिळक चौकात पुराचं पाणी पोहोचलं आहे. आयर्विन पुलावरुन पुणे-इस्लामपुराकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सांगली शहराशी संपर्क तुटला आहे.

तर साताऱ्यातील कराड तालुक्यातही तुफान पाऊस झाला आहे. कराडमधील रेठरे या गावाचं स्थलांतर करण्यात आलं आहे. गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या आधी 2005 मध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूर आला होता. पण यंदा 2005 पेक्षाही पूरस्थिती गंभीर असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.