सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीने 54 फूट पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात तर कृष्णा नदीच्या रुद्रावतारामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने हजारो लोक अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या टीम बरोबरच राजकीय नेतेही पाण्यात उतरले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातून 43,635 लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. पूर आलेल्या भागातील स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणी स्वतः पाण्यात उतरुन मदत कार्यास लागल्याने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. जिल्ह्यातील या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आणि जिल्हा पोलिस प्रमुख स्वतः लक्ष ठेवून असून पुराच्या पाण्यात कोणी अडकून पडणार नाही याची खबरदारी संपूर्ण प्रशासन घेताना दिसत आहे.


सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री


वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने ज्या ठिकाणी लोक अडकले आहेत तिथे बोटीच्या सहाय्याने पोहोचून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कालपासून स्वतः पाण्यात उतरले आहेत. काल त्यांनी वाळवा तालुक्यातील शिगाव येथे पूरपरिस्थितीची पाहणी करत जे लोक अडकले आहेत, त्यांना स्वतः बोटीत बसवून  सुरक्षितस्थळी हलवले. यावेळी एका चिमुरडीला सदाभाऊ खोत यांनी डोक्यावर घेत कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत बोटीत बसवले. सदाभाऊ खोत आज पहाटेपासून पुन्हा लोकांच्या मदतीसाठी पाण्यात उतरले पाहायला मिळत आहेत.


वाळवा तालुक्यातील नागठाणे गावातील नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. साधारणपणे 400 लोक पाण्यामध्ये रात्रीपासून अडकलेले आहेत. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने खोत या अडकलेल्या लोकांशी संपर्क करुन त्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.


आमदार विश्वजित कदम


पलूस तालुक्यातील नादिकाठच्या गावांना महापुराने वेढले आहे. महापुराचे पाणी पात्राबाहेर दूरवर पसरल्याने गावोगावी जाणारे मार्ग बंद झाले आहेत. नदी ओढ्यांवरील पुलांसह गावांमधील बहुतांशी घरेही पाण्याखाली गेली आहेत. अशा गंभीर पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीला प्रशासकीय यंत्रणेसोबत आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या सर्व यंत्रणेकडून  मदतीचे हात सरसावले आहेत. आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी आज मंगळवारी दुपारी पुराने वेढलेल्या भिलवडी गावात प्रवेश केला आणि महापुरात अडकलेल्या लोकांशी संवाद साधला.  इथल्या पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या.


ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्यासह कार्यकर्ते तसेच अनेक तरुण प्रशासनाच्या मदतीला पुढे आले. यामुळे बाहेर मुसळधार सरी कोसळत असताना पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत कार्याचा पाऊस सुरु आहे. बाहेर काढलेल्या पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवणाची तसेच वैद्यकीय उपचार अशा सर्व सोयीसुविधा भारती विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. महापुराचे पाणी घराच्या दारात आणि घरात घुसल्यामुळे भयभीत झालेल्या पुरग्रतांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार डॉ. विश्वजित कदम खंबीरपणे उभे राहिले आहेत. दिवसरात्र पूरग्रस्तांसोबत राहून त्यांच्यासोबतच भोजन नाष्टा करीत आहेत. पूरग्रस्तांच्या व्यथा स्वतः त्यांच्या समवेत राहून अनुभवलेल्या आमदारांनी पूरग्रस्तांसाठी चादर आणि ब्लॅंकेट तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे.


इथल्या पूरग्रस्त नागरिकांच्या जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. या जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोनहीरा कारखान्याच्या माध्यमातून चारा पुरवला जात आहे. पुराने वेढलेल्या गावांमध्ये बोटीने स्वतः जाऊन पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. इतकेच नव्हे तर पूर ओसरल्यावर रोगराई पसरु नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची पूर्वतयारीही आमदार डॉ.विश्वजित कदम करत आहेत.


संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष, सांगली


जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस तालुक्यातील गावामधील पूर स्थितीची पाहणी करण्यास तीन दिवसांपासून सुरुवात केली आहे. कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठच्या अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिह देशमुख यांनी पलूस तालुक्यातील पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या गावांना भेटी देत त्याना सुरक्षितस्थळी नेत नागरिकांना दिलासा दिला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी, आमनापूर, धनगाव या गावामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचं समजताच,  देशमुख यांनी तात्काळ गावांना भेट देऊन एनडीआरएफ टीमच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले. आज पहाटेपासून पुन्हा देशमुख लोकांना मदत करण्यासाठी बाहरे पडले आहेत. संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस तालुक्यातील सूर्यगाव, अंकलखोप, नागठाने, विठ्ठलवाडी या गावातील पूरग्रस्तांना भेट दिली आणि संबंधित गावातील पूरस्थितीचा संपूर्ण आढावा घेत, या लोकांसाठी सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करुन दिल्या.


जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी 


जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील अनेक गावाची पाहणी करत पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहे र काढण्यास मदत केली. बहे भागातील अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकल्याचं समजताच त्या ठिकाणी पोहोचत ट्रॅक्टरच्या सहायाने या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. यावेळी लोकांना नेताना जयंत पाटील यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत सुरक्षित स्थळ गाठलं. एनडीआरएफ टीमच्या मदतीनेही लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यास जयंत पाटील मदत, मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत. वाळवा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदीवरील पुलावरुन होणारी वाहतूक शुक्रवारी रात्रीपासूनच बंद करण्यात आली आहे. यामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांचा आणि कराड तालुक्याचा  इस्लामपूरशी संपर्क चार दिवसांपासून तुटला आहे. तसेच नरसिंहपूर, शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, लवंडमाची या गावांचा तालुक्याशी देखील संपर्क तुटला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या मदतीला स्वतः जयंत पाटील उतरले असल्याचे चित्र आहे.






सुभाष देशमुख, सांगली जिल्हा पालकमंत्री

सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली. भिलवडी, धनगाव, अमणापूरसह सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी तसंच पूरग्रस्त भागात जाऊन तिथल्या परिस्थितीची माहिती घेत नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी देशमुख यांनी बोलताना सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पुराच्या परिस्थितीवर प्रशासनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे, योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगितले.


सुरेश खाडे, सामाजिक न्यायमंत्री
सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे दोन दिवसापासून सांगली, मिरजमधील नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहेत. सांगली, मिरजमधील नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने अनेक परिसर पाण्याखाली गेले आहेत.  मिरजमधील पाणी शिरलेल्या भागात भेट देऊन लोकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी खाडे यांनी पुढाकार घेतला.