मुंबई :  एकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं (Heatwave) संकट असताना दुसरीकडे वीजेच्या मागणीतही रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे.   राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीनं उच्चांक गाठला आहे. मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली. एकट्या मुंबईची वीजमागणी ही 3 हजार 678 मेगावॅटवर पोहचली आहे.


महावितरणच्या ग्राहकांची आजवरची सर्वाधिक वीज मागणी ही एप्रिल 2022 मध्ये 24 हजार 996 मेगावॅट नोंदवण्यात आली होती.  हा आकडा आता 25 हजार 100 मेगा वॅट वीज मागणीसह मागील आठवड्यात मागे पडला  होता. राज्यभरात उष्णतेची लाट पाहता मंगळवारी 18 एप्रिलला दुपारी तीनच्या दरम्यान महावितरणची वीजमागणी 25 हजार 437 मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली होती.   


मुंबईची वीज मागणी ही 3678 मेगावॅटवर


मुंबईची वीज मागणी ही 3678 मेगावॅटवर पोहचली आहे. त्यामुळे राज्यभरातील वीज मागणी हे 29,116 मेगावॅट पर्यंत पोहचली आहे. विना भारनियमन कुठल्याही अडथळ्याशिवाय ही वीज अखंड स्वरूपात वीज वितरण कंपन्यापर्यंत पोहोचण्याचे काम महापारेषण कंपनीने व तिथून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम वीज वितरण कंपन्यांनी केले आहे. उन्हाळ्यात तापमान वाढ सर्वत्र पाहायला मिळत आहे.


देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे  ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे.  बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तापमान चाळीशी पार गेल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे . उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत.  एसी, पंखे कुलरचा वापर सर्वत्र वाढला आहे त्यामुळेच  विजेची मागणी देखील वाढलेली पाहायला मिळत आहे.


उष्णता वाढली, काय घ्याल काळजी?


दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका. विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) याचा वापर करा. त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा. घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा. तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका. उन्हात जाताना डोकं झाका म्हणजे उन्हापासून बचाव होईल.