पुणे :  'मरावे परी किर्तीरुपी उरावे' याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात आला. खेडच्या एका 23 वर्षीय शेतकऱ्याने दिल्लीच्या 24 वर्षीय तरुणाला जीवदान दिलं आहे.  या अन्नदात्याचा ब्रेन डेड झाल्यामुळे त्याचं हृदय दिल्लीच्या तरुणाला देण्यात आलं. इतकंच नाही तर यकृत आणि किडनीही दान करून अन्य तिघांचेही प्राण वाचवले. त्यामुळे खेडचा हा 'अन्नदाता' खरोखरच जीवनदाता बनला.

 

दुसरीकडे पुणे ते दिल्ली असा जिवंत हृदयाचा धडधडता प्रवास पुणेकरांनी अनुभवला.

 

काय आहे प्रकरण?

 

खेडच्या एका 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा अपघात झाला होता. 19 एप्रिलला झालेल्या या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने, त्याला ब्रेनडेड घोषीत करण्यात आलं.

 

तरण्याबांड तरुणाचा हा आघात कुटुंबीयांना सहन न करण्यासारखा होता. मात्र अशावेळीही त्यांनी धीरोदत्तपणा दाखवला. नातेवाईकांनी त्याचे डोळे, मूत्रपिंड, यकृत आणि हृदय दान करण्याचा निर्णय घेतला.

 

या निर्णयानंतर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाने तत्परतेने हालचाली सुरु केल्या.

 

ब्रेन डेड झालेल्या या जीवनादात्याचं धडधडतं हृदय गरजू रुग्णाला बसवण्याच्या ठरवण्यात आलं. मात्र हा गरजवंत होता पुण्यापासून जवळपास 1500 किलोमीटर दूर राजधानी दिल्लीत.



पोलिसांची मदत

 

धडधडतं हृदय पुण्याहून दिल्लीला पोहोचवण्याचा रुबी हॉल क्लिनिकचा निर्णय झाला. मात्र इतका मोठा प्रवास अत्यल्पवेळेत पूर्ण करणं आवश्यक होतं. त्यासाठी रुबी हॉल क्लिनिक ते पुणे विमानतळ आणि तिथून दिल्ली हा प्रवास सोपा नव्हता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने यासाठी पोलिसांची मदत घेतली.

 

'ग्रीन कॉरिडॉर'


रुबी हॉल क्लिनिक ते लोहगाव विमानतळ हे 7.8 किमीचं अंतर पार करण्यासाठी पुणे पोलिसांनी "ग्रीन कॉरिडॉर‘ तयार केला. पोलिसांनी कंबर कसून आपला ताफा रस्त्यावर उतरवला आणि हे अंतर अवघ्या साडेसहा मिनिटात पार केलं. रखरखत्या उन्हात भर दुपारी हा थरार पुण्याच्या रस्त्यावर सुरु होता.

 

एरव्ही हेच अंतर पूर्ण करण्यासाठी सुमारे अर्धा तास आणि त्यापेक्षाही अधिक वेळ लागतो.

 

दिल्लीहून पुण्यात आलेल्या 'एम्स'च्या वैद्यकीय पथकाने दुपारी साडेतीन वाजता धडधडतं हृदय घेऊन दिल्लीकडे कूच केली.

 

यकृत महिलेला, किडनी अन्य गरजूंना


एकीकडे धडधडतं हृदय दिल्लीला पाठवलं, तर दुसरीकडे या जीवनदात्याचं यकृत रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या 50 वर्षीय महिलेला देण्यात आलं. तर त्याच्या किडन्या दोन रुग्णांना बहाल करण्यात आल्या.