Rajesh Tope : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी देण्यात आल्याचे टोपे म्हणाले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीबाबत काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यास परवानगी - आरोग्यमंत्री
राज्यात आता कोरोनाचे सावट कमी झाले आहे. रूग्णसंख्याही कमी होताना दिसत असल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिलला होणाऱ्या 131 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, काल सहयाद्री अतिथीगृह येथे महत्वाची बैठक पार पडली, त्यावेळी बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खरोखरच खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे.
गुडीपाडव्याबाबतचा निर्णयाबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री?
राज्यातील निर्बंध हळहळू शिथील केले जातील. सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा, डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले, तसेच गुढीपाडव्याबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील. मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेतील. शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असा मला विश्वास असून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असे टोपे म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे जनतेच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतात असंही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.
चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
महापरिनिर्वाणदिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्यावतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात येऊन त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी मुख्य सचिव आणि संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
यावेळी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबई महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांबाबत माहितीचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे जयंतीला येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढू शकते, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्यावतीने विविध सदस्यांनी केल्या.
राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी पाहता, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, यादरम्यान, एकही मृत्यू झालेला नाही. या दरम्यान 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 960 वर पोहोचली आहे. तसेच, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा वाढून 1,057,915 वर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या
Coronavirus Updates: आनंदवार्ता! राज्यात 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होण्याची शक्यता
Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 26 जण कोरोनामुक्त
Rajesh Tope : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत राजेश टोपे यांची पत्रकार परिषद, काय म्हणाले आरोग्यमंत्री?
DA Hike : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला