Auranagabad : औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. शहरात एका दिवशी डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडून आलेल्या 37 तलवारी आणि एक कुकरी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेण्यात आले आहेत, ताब्यात असलेल्या दोघांकडून चौकशी करण्यात येत असून औरंगाबादेतील 5 आणि जालन्यातील 2 जणांनी 37 तलवारी 1 कुकरी मागवल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 


पोलीस दलही हादरले


एवढा मोठा तलवारीचा साठा केवळ सात व्यक्तींनी मागवला असून यामुळे औरंगाबाद पोलीस दल हादरून गेलंय. शहराच्या निराला बाजार परिसरामध्ये असलेल्या या डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडे एकाच दिवशी हा एवढा मोठा शस्त्रसाठा आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर  सातत्याने  तलवारी का येतात. कुठून आणि कशी येतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालिंदर आणि अमृतसर येथून मागवण्यात आल्या आहेत. या 37 तलवारी सात जणांच्या नावावर मागवण्यात आल्या आहेत. यातील पाच जण औरंगाबाद येथील तर दोन जण जालन्यातील आहेत.आपल्या मोबाईल वरुन सहज ऑनलाईन वर ही शस्त्रे मागवता येतात. दिल्ली, अमृतसर आणि राजस्थानमधून हे शास्त्र भिवंडीच्या एका गोडाउन मध्ये दाखल होतात आणि तिथून महाराष्ट्रभर वितरित होतात .मात्र औरंगाबाद मध्ये dtdc याच कूरियर सर्विस च्या मार्फत ही शस्त्र का आली हा देखील प्रश्न आहे. औरंगाबादच्या दंगलीनंतर 2018 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. यापूर्वी जुलै 2021 मध्ये 41 तलवारी, दोन गुप्ती आणि 6 कुकरी असा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला. अशा कुरियर कंपनीद्वारे शोभेच्या वस्तू म्हणून तलवारी मागवल्या जातात आणि त्यानंतर त्याला धार लावली जाते.


पोलिसांसमोर आव्हान


या तलवारी ज्याच्या नावावर आणि पत्त्यावर मागवण्यात आल्या, त्या व्यक्तीचे नाव आणि पत्तेही अर्धवट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.  त्यामुळे या तलवारी कोणत्या उद्देशासाठी मागवल्या होत्या हे  शोधणं पोलिसांसमोर आव्हान आहे. यापूर्वी अशा ऑनलाईन पद्धतीने शत्र मागणाऱ्या डझनभर लोकांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे मात्र हे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे.