पुणे : आरोग्य भरती परीक्षेतील पेपरफुटीबद्दल पुणे सायबर पोलिसांकडून आज औरंगाबादमधील बबन मुंढे आणि सुरेश जगताप या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली. या आधी पोलिसांकडून विजय मुराडे आणि अनिल गायकवाड यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 


यातील विजय मुराडे आणि अनिल गायकवाड यांना आरोग्य भरतीचा पेपर बबन मुंढे कडून मिळाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. तर सुरेश जगताप हा औरंगाबादमधे वेगवेगळ्या भरतींसाठी अकॅडमी चालवतो. त्याने आरोग्य भरतीचा पेपर मुराडेकडून घेऊन त्याच्या अकॅडमीतील मुलांना दिल्याचं उघड झाल आहे.  31 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता झालेल्या आरोग्य भरतीचा पेपर या आरोपींना सकाळी साडे आठ वाजताच मिळाल्याच पोलिसांच म्हणणं आहे.


ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे तयारी केलेल्या विद्यार्थ्यांकडून न्यायालयात याचिका दाखल करून करण्यात आली आहे.    


मिलिट्री इंटेलिजन्सने आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याचे पुरावे 9 नोव्हेंबरलाच पिंपरी - चिंचवड पोलीसांकडे दिले होते. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिस पेपर फुटलाच नव्हता असा दावा करू लागल्यानं अखेर या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या  खंडपीठात याचिका केली होती. न्यायालयात हे प्रकरण पोहचल्याचं दिसताच आरोग्य आणि पोलीस खातं जागं झालं आणि पुणे सायबर सेलला गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागलेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी अनेक जणांना अटक होण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :