ST Workers Strike : महाराष्ट्रात मागील महिनाभरापासून एसटी कर्मचारी संप (ST Worker Strike) करत आहेत. वेतन वाढ आणि एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे सरकारची डोकेदुखी वाढली असली तरी सामान्यांचा जीवही टांगणीला लागला आहे. कारण संपामुळे एसटी वाहतूक बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
एसटी सेवा बंद असल्यामुळे खासगी वाहनाने दुप्पट भाडे देऊन सामान्य नागरिक प्रवास करत आहेत. नांदेड जिल्ह्यात सध्या काळी पिवळी टॅक्सी, खाजगी ट्रॅव्हल्स, खाजगी प्रवासी वाहने यातून नागरिक प्रवास करत आहेत.या वाहनांची आसनक्षमता फक्त 5 अथवा 6 प्रवाशांची असताना त्यातून टपावर बसून किंवा वाहनाला लटकून धोकादायक आणि जीवघेणा प्रवास प्रवासी करत आहेत. यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयही काना डोळा करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अपघातांचे यामुळे वाढल्याचेही समोर आले असून शासन यावर नेमका कधी तोडगा काढेल याकडे सामान्यांचे लक्ष आहे.
संपावर तोडगा निघेना
वेतन वाढ व एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सरकार, एसटी महामंडळाने संपावर तोडगा म्हणून वेतनवाढीची घोषणा केली आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले तर अजूनही मोठा कर्मचारी वर्ग अजूनही संपावर आहे. आतापर्यंत नऊ हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि दोन हजारच्या जवळपास कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. संप मागे घेतला जात नसल्यानं महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लावण्याची शक्यता आहे. मेस्मानुसार महामंडळाला संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करता येणार आहे.
संबंधित बातम्या :
- कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : अनिल परब
- ST Strike : पैसे देऊनही संप सुरु राहत असेल तर पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करणार; अनिल परबांचा इशारा
- ST strike Updates : 11 हजार एसटी कर्मचारी कामावर परतले; महामंडळाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha