ममता दीदींची मोदींवर छाप म्हणूनच त्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढल्या होत्या, पण केंद्र सरकारने लस कंपन्यांना राज्य सरकारबरोबर लसीच्या बाबतीत चर्चा करू नका असे सांगत आम्हाला 75 टक्के लस द्यावी अशी मागणी केली. लसीचे दोन्ही डोस घेतलेले देश आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारला आमची विनंती आहे की या जुलैपासून लसीचे डोस वाढवा.
सांगली : लस देणं ही केंद्राची जबाबदारी असल्याचं संपूर्ण देश सांगत होता, सर्वोच्च न्यायालय देखील सांगत होते. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदींनी 18 वर्षांवरील सर्वांसाठी लस विकत घेतली आणि त्यावर स्वतःचा फोटो छापला. ममता दीदीच्या या कृतीची मोदी साहेबांवर अधिक छाप पडली आणि त्यानंतर संपूर्ण देशात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे मला ममता दीदीचे आभार मानायला हवेत असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
सांगली जिल्ह्यासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या व्याज निधीतून 28 रुग्णवाहिका आणि शासनाकडून 7 रुग्णवाहिका अशा एकूण 35 रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सांगली पोलिस दलाच्या परेड ग्राऊंडवर पार पडला. यावेळी मुश्रीफ बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूड्डी उपस्थित होते.
देशात दोन्ही डोसचे 70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल असे वाटत नाही. जर दोन्ही डोस घेतले असले तरी कोरोना होऊ शकतो पण धोका कमी होतो. दोन्ही लस तयार करणाऱ्या सिरम आणि नागपूरच्या भारत बायोटेक या दोन्ही कंपन्या भारतात आहेत. दररोज लसीचे मोठे उत्पादन करण्याची क्षमता या कंपन्यामध्ये आहे. त्यामुळे जर आपण नियोजन केले असते तर 6 महिन्यात आपल्या देशात लसीकरण पूर्ण झाले असते असेही मुश्रीफ म्हणाले.
लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढल्या होत्या, पण केंद्र सरकारने लस कंपन्यांना राज्य सरकारबरोबर लसीच्या बाबतीत चर्चा करू नका असे सांगत आम्हाला 75 टक्के लस द्यावी अशी मागणी केली. लसीचे दोन्ही डोस घेतलेले देश आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारला आमची विनंती आहे की या जुलैपासून लसीचे डोस वाढवा. संपूर्ण राज्याची लसीकरण करण्याची राज्याकडे पूर्णपणे यंत्रणा तयार आहे. लवकरात लवकर जर लस आणि आपण सहा महिन्यांच्या आत 70 टक्के जनतेचे दोन्ही डोस पूर्ण करू शकलो तर राज्यातील गतजीवन पुन्हा सुरू होईल, अशी आशाही मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय
महामारीचे संकट जगातील 220 देशांमध्ये आले आहे. अनेक महामाऱ्या आल्या पण अशी महामारी प्रथमच आली. आपल्याही देशात, राज्यात ही कोरोना महामारी आली आहे. या कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासनाने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत येते. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून कोरोना समुळ नष्ट करण्यासाठी कोरोना मुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्रत्येक गावाने चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी केली तर आपले गाव कोरोनामुक्त होईल. त्यामुळे तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होईल असा विश्वास मुश्रीफ यांनी बोलून दाखवला. तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या निधीमधून काम करण्यासाठी दोन निर्णय घेण्यात आले असून यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 5 कोटी लोकांना आरसेनिक अल्बम या गोळ्याचे वाटप करण्यात आले. तर आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्राम विकास विभागाच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनिस, जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांना कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यु आल्यास 50 लाख विम्याचे कवच देण्यात आले. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांना विमा कवच लागू असलेल्या संबधित 160 कर्मचाऱ्यांच्या वारसांना याचा लाभ देण्यात आला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.