Harshvardhan Patil : राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या (National Sugar Association) अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांना तिकीट नाकारल्यानंतर भाजपकडून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. दरम्यान, गुजरातचे केतन भाई पटेल यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या उपाध्यक्षपदी  बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 


50 वर्षाच्या इतिहासात प्रथमच साखर संघावर भाजपचे वर्चस्व


दरम्यान, 50 वर्षाच्या इतिहासात प्रथमच साखर संघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचं पाहायला मिळत आहे. ऊसाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं वर्चस्व आहे. त्यामुळं महाराष्ट्राला राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे. देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे, तसेच साखर उद्योगांपुढील अडचणी केंद्र सरकारकडून सोडवून घेण्याचे काम राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमातून करण्यात येते.


लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय सहकार संघाच्या निवडी महत्त्वाच्या


दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीमुळं राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय सहकार संघाच्या निवडी महत्त्वाच्या मानल्या जात आहे. राष्ट्रीय सहकार साखर संघात गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदाच भाजपला वर्चस्व मिळवता आले. हर्षवर्धन पाटील  हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. नीरा भीमा सहकारी साखर कारखानाही त्यांच्याकडेच आहे. 2019 पासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये सक्रीय असून त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवले जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर संधी देण्यात आली नाही. त्यांची साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  


दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड केल्यामुळं त्यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. तसेच, ते आज दुपारी शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या निवडीमुळे हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा आले आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Harshavardhan Patil : नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांची विरोधकांवर सडकून टीका, म्हणाले आमदारकीचा मार्ग मोकळा कारण्यासाठी...