पुणे : पुण्यात अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच (Pune accident) पुण्यातील नवले (Navle Bridge Accident) पूल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ एका डंपरने ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. यात डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 6 वाजता झाला आहे. 
 
नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस आहे.इथून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स बाहेर पडत असताना मुंबईच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यात सात प्रवाशी जखमी झाले असून ह्या अपघातात ट्रॅव्हल्सचे तसेच डंपरचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.  या पुलावर विचित्र स्लोप असल्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात. 


अपघात थांबेना !


दोनच दिवसांपूर्वी  पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला होता. एका भरधाव ट्रॅंकरने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची ही घटना घडली आहे. या अपघातात अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामुळे एका बाजूने नवले पुलावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होची. अपघात पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.


नवले पूल बदनाम



पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.


19 ब्लॅकस्पॉट निश्चित 


शहरातील 19 अपघात प्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट) निश्चित केली आहेत. या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी वाहतूक विषयक सुधारणा करण्यासंबंधी वाहतूक पोलिसांनी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असून त्यानुसार काही सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून रस्ते अपघातात मृत पावणाऱ्यांमध्ये 67% दुचाकी स्वारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Police Helmet : पुण्यात पोलिसांना हेल्मेट सक्ती: हेल्मेट न वापरल्यास थेट कारवाई होणार