Babanrao Taywade : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मराठा सर्वेक्षण अहवाल आज सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण (Maratha Reservation) अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारताना आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का बसू देणार नाही, असे वक्तव्य तीन वेळा केले आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.


मनोज जरांगेंनी उपोषण सोडावं


मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आता आपलं उपोषण सोडावं, कारण त्यांच्या दोन प्रमुख मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहे. जरांगे यांनी मागणी केल्याप्रमाणे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याचे सरकारने आधीच स्वीकारले होते. तर ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही, अशांसाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारावर अतिरिक्त आरक्षण देण्याकडे सरकारने पावलं उचलले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता नवीन मागणी न करता उपोषण आणि आंदोलन मागे घ्यावं असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.


सर्वेक्षण करून जातनिहाय गणना करावी


मराठा समाजाला मागच्या वेळेला फडणवीस सरकारने जे आरक्षण दिले होते आणि ज्यावर सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेत तेव्हाच्या अहवालामध्ये काही त्रुटी काढल्या होत्या, त्या सर्व त्रुटी राज्य मागासवर्ग आयोगाच्या आजच्या अहवालानंतर दूर होतील, अशी अपेक्षाही तायवाडे यांनी व्यक्त केली आहे. ज्या द्रुतगतीने राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास केला. त्याच धर्तीवर तीव्र गतीने सर्वेक्षण करून जातनिहाय गणना करावी, अशी मागणीही तायवाडे यांनी केली आहे. 


विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला 


राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हे विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला होणार आहे. मराठा समाजाला आता मागासलेपणाच्या आधारावर आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil : हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंकडून उपचार घेण्यास होकार, सकल मराठा समाजाकडून आज 'चक्काजाम' आंदोलन