Har Ghar Tiranga : देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर झेंडा लावण्याचा उपक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे... पण यात तीन दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. बीड, सोलापूर आणि पालघरमध्ये या दुर्दैवी घटना घडल्यात... पालघरमधील जव्हारमधील राजेवाडी यागावात 65 वर्षीय लक्ष्मण शिंदे यांचा घरावर झेंडा लावण्यासाठी चढले असताना घराचे कौल फुटले आणि पडल्यानं गंभीर दुखापत झाली.. आणि त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे सोलापुरातल्या मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे घरावर झेंडा लावताना पाय घसरुन पडल्यानं तरुण जखमी झाला. महेश तळळे असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वरपगाव येथे एका तरुणाचा मृत्यू झालाय. घरावर लोखंडी अँगलला लावलेला तिरंगा ध्वज वाऱ्याने कलल्याने तो व्यवस्थित करीत असताना विद्युत तारेचा शॉक लागून 30 वर्षीय मुक्तार अशोकाद्दीन शेख यांचा मृत्यू झालाय. देशभरात 75 व्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष आहे. पण उत्साहाच्या नादात कोणतीही दुखापत होऊ नये आणि काळजी घेऊनचं आपल्या घरावर तिंरगा लावावा. असं आवाहन एबीपी माझाही करतंय.
अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी झेंडा लावताना घरावरून पडून मृत्यू
अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर झेंडा लावण्याचा उपक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे, शहर तसेच ग्रामीण भागातही देशाविषयी असणारे प्रेम आणि प्रशासनाकडून तालुक्यात शुक्रवारपासून करण्यात येत असलेले हर घर झेंडा अभियान, या गोष्टीला प्रेरित होऊन जव्हारमधील राजेवाडी या गावातील 65 वर्षीय लक्ष्मण भाऊ शिंदे हे त्यांच्या घरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते. यावेळी कौले फुटून खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयात सेवा देऊन 5 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते, शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास, आपल्या राहत्या घरावरती तिरंगा लावण्यासाठी चढल्यानंतर कौले फुटून खाली पडले, त्यानंतर तात्काळ त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु दुखापत अधिक झाल्याने, नाशिक येथील सत्र रुग्णालयात पाठविण्यात आले होते, परंतु तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ध्वज व्यवस्थित लावताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू -
घरावर लोखंडी अँगलला लावलेला तिरंगा ध्वज वाऱ्याने कलल्याने तो व्यवस्थित करत असताना विद्युत तारेचा शॉक लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यात वरपगाव येथे आज दुपारी घडली. मुक्तार अशोकाद्दीन शेख असे या तरुणाचे नाव आहे.
केज तालुक्यातील वरपगाव येथील मुक्तार अशोकाद्दीन शेख ( वय 30 ) या तरुणाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्याचे कुटुंब शेतात पत्र्याच्या वास्तव्यास असून त्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इतरांप्रमाणे घरावर लोखंडी अँगलला तिरंगा ध्वज लावला होता. दुपारी त्याला घरावर लावलेला झेंडा कललेला दिसला. तो व्यवस्थित करण्यासाठी गेला असता घराजवळून गेलेल्या विद्युत तारेला लोखंडी अँगलचा स्पर्श झाल्याने मुक्तार शेख यास विजेचा शॉक बसला. त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला.
सोलापुरात तरुण जखमी -
दुमजली घरावर झेंडा लावताना पाय घसरून पडल्याने तरुण जखमी झाला आहे. सोलापुरातल्या मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे ही घटना घडली आहे. महेश तळळे असे या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी आठच्या सुमारास महेश आपल्या दुमजली घरावर झेंडा लावण्यासाठी चढला होता. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे भिंत निसरडी झाली होती. पाय घसरल्याने जवळपास 25 फूट वरून महेश खाली कोसळला. यामध्ये महेशच्या डोक्याला आणि कमेराला दुखापत झाली आहे. त्याला सोलापुरातल्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. बेशुद्ध अवस्थेत महेश याला सोलापूरच्या खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. मात्र सध्या महेश शुद्धीवर असून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.