सिंधुदुर्ग : जगप्रसिद्ध असलेला हापूस आंब्याचा हंगाम 40 दिवस लांबणार आहे. त्यामुळे जगभरातील हापूस आंबा खवय्यांना हापूसची चव चाखायला वाट पाहावी लागणार आहे. 'क्यार' चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसाने भातशेतीसोबत हापूस आंबा बागायतींवर मोठा परिणाम झालाय. हवामानात झालेला मोठा बदल आंबा पिकांसाठी मारक ठरत आहे. हवेत आर्द्रतेचे व जमिनीमधील पाण्याचे प्रमाण वाढल्याने आंबा कलमांना पुन्हा पालवी येऊ लागली आहे. तसेच आलेल्या पालवीला करपा रोगाचा व तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागल्याने आंबा बागायतींवरील फवारण्यांच्या आर्थिक ताणामुळे आंबा बागायतदारांचे चांगलेच कंबरडे मोडणार आहे. एकंदरीत वातावरणाचा परिणाम पाहता यावर्षीचा आंबा हंगाम हा सुमारे 40 दिवस पुढे लांबलला आहे. हंगाम लांबला तर उत्पादन वाढेल, मात्र दर मिळणार नसल्याने उत्पन्न घटणार आहे.


क्यार चक्रीवादळादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. सिंधुदुर्गात हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन देवगड तालुक्यात घेतले जाते. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंबा बागायतींना बसला आहे. वादळादरम्यान झालेल्या पावसामध्ये एकाच दिवशी सुमारे 200 मिमी. इतका पाऊस देवगड तालुक्यात पडला आहे. खऱ्याअर्थाने आंबा हंगामाला सप्टेंबर मध्यापासून सुरुवात होते. सप्टेंबरमध्ये आलेल्या पालवीला ऑक्टोबरमध्ये मोहोर येण्यास सुरुवात होते. मात्र वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतींमध्ये पालवी प्रमाण खूपच अल्प प्रमाणात दिसत आहे. हवेतील आद्र तेचे प्रमाण वाढल्यामुळे आंबा बागायतींवर अनेक रोगांची आक्रमणे होण्याची शक्यता आहे. पालवी आलेल्या झाडांना करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचं फळसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी सांगितलं. क्यार या चक्रीवादळामुळे आंबा हंगामावर निश्चितच मोठा परिणाम होणार आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. सकाळी 90 ते 95 तर दुपारनंतर 80 ते 85 अंश सेल्सियस इतके सध्या आर्द्रतेचे प्रमाण आहे. ज्या आंबा झाडांना सध्या पालवी आलेली आहे. त्या झाडांना पुन्हा पालवी येऊ लागली आहे. पालवी आलेल्या झाडांना करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडरोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलामुळे देवगड तालुक्यातून जो फेब्रुवारी व मार्चमध्ये मार्केटमध्ये जाणारा आंबा मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम हा 40 दिवस लांबण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत आंबा बागायतदारांनी बुरशीनाशकांची फवारणी करणे महत्वाचे आहे.


जमिनींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनी ओल्या आहेत. त्यामुळे आंबा झाडाला येणारी पालवी देखील उशीरा येणार आहे. 15 सप्टेंबर या कालावधीत झाडाला पालवी येऊन मोहोर येऊ लागतो. मात्र पालवीचे प्रमाण खुपच अत्यल्प आहे. अजूनही झाडांना पालवी यायची आहे. आंबा कलमांना पालवी येण्यासाठी जमिनीला ताण बसण्याची आवश्यकता असते. आंबा झाडाला तीन प्रकारचा ताण बसतो. तो म्हणजे पाण्याचा, थंडीचा आणि खाऱ्या वाऱ्याचा ताण बसतो. पाऊस पडल्यामुळे व खारे वारे व थंडी नसल्यामुळे झाडाला ताण बसत नाही. त्याचा परिणाम आंब्याच्या पालवीवर झाला आहे. उशीरा येणाऱ्या पालवीमुळे तुडतुड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच मीझ माशी, नाग अळी व शेंडे पोखरणारी अळी यांचा परिणाम आंबा झाडावर होणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी या कालावधीत कुटल्याही परिस्थितीत पहिली फवारणी करणे आवश्यक आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा हंगाम लांबणार आहे.


आंबा बागायतदाराला या सर्व चक्रव्यूहातून जावे लागणार आहे. झाडांना पालवे येण्यास एक ते दीड महिना उशीर होणार असल्याने आंबा हंगाम लांबणार आहे. आंबा हंगाम लांबल्यामुळे एकाचवेळी आंबा उत्पादन होणार असल्याने त्याचा परिणाम आंबा दरावर होऊ शकतो. मुंबई मार्केट किंवा अन्य मार्केटमध्ये यावर्षी हापूसला चांगला दर मिळणे कठीण असल्याने आंबा बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.


लांबलेल्या पावसामुळे यंदा हापूस बाजारात उशीरा येण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलाचा फटका आंबा उत्पादक शेतकर्‍यांना बसणार असून त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कोकणात ऑक्टोबर महिन्यात पाऊस जातो. ऑक्टोबर हिटमुळे जमीन तापते आणि ताण मिळतो. यावेळी मतलई वारे सुटतात. वापसा, मतलई वारे आणि थोडी थंडी ही कलमांना मोहोर येण्यास अनुकूल परिस्थिती आहे. परंतु यंदा मोहोर येण्यास वातावरण अजूनही प्रतिकूल आहे. फ्लॉवरिंगला प्रतिकूल वातावरण असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्‍चित झालं आहे. प्रतिकूल वातावरणामुळे फ्लॉवरिंग उशीरा झाले की हार्वेस्टिंगलाही विलंब होईल. नोव्हेंबर सुरु झाला तरी थंडी नाही. त्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्येच होणार आहे. त्यानंतर पुढे आंबा तयार होण्यासाठी किमान 110 ते 120 दिवस लागतात. त्यासाठी यंदा मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबा तयार होईल, असा अंदाज आहे.