अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र राजभवनावर पोहचण्यापूर्वीच मोर्चा अडवून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अडवल्यानंतर बच्चू कडू यांनी आयनॉक्स थिएटर मित्तल टॉवरसमोर आंदोलन केले. मोर्चात शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. सोयाबीन, सडलेले कांदे रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
पाच दिवसात निर्णय नाही झाला तर आम्ही पुढच्या वेळी काहीही न सांगता थेट राजभवनावरच पोहचणार असल्याचे 'एबीपी माझा'शी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले. सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार नाही का ? त्यांना वाऱ्यावर सोडणार का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. राज्यपालांनी राज्यात किमान दौरा करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना 25000 रूपयाची मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
Bacchu Kadu Protest | ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या आंदोलनानंतर आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात | मुंबई | ABP Majha
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, राज्यात सरकार नाही मग शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार? राज्यपालांकडे काही हक्कच नसतील तर त्यांनी सुत्रं हातात कशाला घ्यायची ? राज्यपालांनी फक्त राजभवनात बसून राहायचं का ? ते काय स्वर्गातून आले आहेत का? राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहणं गरजेचं आहे. राज्यपालांना प्रशासकीय अधिकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे अपेक्षित आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चावर दडपशाही करण्यात आली. किसान सभा या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे.शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विविध पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ फोटो सेशन करत आहेत. पर्यटनाला यावं अशा थाटात दौरे करत आहेत. सत्तेच्या राजकारणात शेतकऱ्यांना मदत करण्याचे विसरून जात आहेत. राजकीय नेत्यांच्या या संतापजनक दिखाऊपणाचाही किसान सभा निषेध व्यक्त करत आहे. मदत जाहीर करण्यात आणखी दिरंगाई झाल्यास सर्व शेतकरी संघटनांना सोबत घेत राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.