बेळगाव : शेतकरी संपादरम्यान विविध आंदोलनात अटक झालेल्यांमध्ये अर्धे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्याखालोखाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. एकट्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या 678 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


शेतकरी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर कधीच फेकू शकत नाहीत. राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या मालाची नासधूस झाली आहे, जे करण्याचा त्यांना अधिकार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र तोडफोड केल्यामुळे, शेतमाल लुटल्यामुळे आणि लुटलेला शेतमाल कार्यकर्त्यांच्या घरात सापडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विविध ठिकाणी लुटलेला शेतमाल कार्यकर्त्यांच्या घरामध्ये सापडला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शेतकरी अडचणीत आहेच, मात्र त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र रस्त्यावर दूध, भाजीपाला फेकून शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर केला.

कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे.