शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा : संभाजीराजे
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 06:50 PM (IST)
रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर विविध भागातून लाखो लोक आले आहेत. हा एक सोहळा राहिलेला नसून लोकोत्सव झालेला आहे. त्यामुळे सरकारने शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात 344 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडला. देशभरातील हजारो शिवभक्त यावेळी उपस्थित होते. यावेळी रायगडावरील राज दरबार, होळीचा माळ, बाजारपेठेचा परिसर भगवा झाला होता. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं विधीवत पूजन करण्यात आलं. मेघडंबरीवरील शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही शिवप्रेमींनी तलवारबाजी, दांडपट्टा या मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सादर केलं.