मुंबई : विदर्भ, मराठवाड्यात झालेली गारपीट शेतमालाच्या नुकसानाबरोबरच नागरिकांच्या जीवावरही उठली आहे. गारपीटीमुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.

जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात गारा अंगावर पडल्यामुळे 70 वर्षीय नामदेव शिंदे या वृद्धाचा मृत्यू झाला. नामदेव शिंदे शेतात जात असताना त्यांना गारांचा मार बसला.

नामदेव शिंदे, जालना

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात 65 वर्षांच्या आसाराम जगताप यांचाही गारांचा मार लागून मृत्यू झाला. शौचाला जात असताना गारांच्या तडाख्यात त्यांचा मृत्यू झाला.

आसाराम जगताम, जालना

वाशिम जिल्ह्यातील महागाव गावातील यमुनाबाई हूंबाड यांनाही गारांच्या तडाख्यात आपला जीव गमवावा लागला.  त्या 80 वर्षांच्या होत्या.

जालना-बुलडाणा रस्त्यावर तीन मित्र 15 मिनिटं कारमध्ये अडकले. गारांच्या तडाख्यामुळे तिघांना आपल्या कारमधून बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पुन्हा गारपीट


विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसला. जालना, वाशिम, बीड, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यात गारपिटीनं अक्षरक्षः थैमान घातलं. काही वेळ ही गारपीट झाली असली तरी अनेक ठिकाणी लिंबाच्या आकाराइतक्या गारा कोसळल्या.

गहू आणि हरभरासारखी पिकं काढणीवर आलेली असताना झालेल्या या गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. नेमकं किती नुकसान झालं, याचा आकडा अद्याप यायचा असला तरी हाताशी आलेला घास हिरावल्या गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं याबाबतचं भाकित वर्तवलं होतं.

पंचनाम्याचे आदेश

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाच्या भरपाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचनामे केले जातील, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीसाठी विमा संरक्षण असून मयतांच्या परिवाराला सुद्धा मदत केली जाईल, असं आश्वासन देशमुखांनी दिलं.

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत, असे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. विमा कंपनीसोबत उद्या बैठक बोलवण्याचे निर्देशही फुंडकरांनी दिले आहेत.

ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचं तसंच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचं नुकसान झालं आहे, त्याबाबत त्वरित विमा कंपन्यांना माहिती कळवण्यास फुंडकरांनी सांगितलं आहे.