कोल्हापूर : 'माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात मी कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून केली आहे. कारण कोल्हापुरात ज्या गोष्टींची सुरुवात होते त्या देशभरात पोहचतात' असा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं कोल्हापूरवरचं प्रेम व्यक्त केलं.


राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत, असं शरद पवार म्हणाले. लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण समारंभात पवार बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शरद पवारांनी स्थानिक आमदार आणि नेत्यांना समोर ठेवून चांगलीच फटकेबाजी केली. 'माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात मी कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून केली आहे. कारण जर चांगली गोष्ट असेल तर ती देशात पोहचते आणि त्यात काही चुका असतील, तर कोल्हापूरकर इथेच सुधारतात' असं पवार म्हणताच एकच हशा पिकला.

शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आणि माझ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अनेक वेळा मतभेत झाले आहेत. सध्या आम्ही दोघेही सत्तेत नाही. मात्र त्यांनी मुंबईत संविधान बचाओ रॅली काढल्यावर मी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल त्याच्या सोबत आम्ही आहोत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

सध्या राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकला आहे. ते कधी संजय मंडलिक यांचं नाव पुढे करुन जिल्ह्याच्या राजकारणात द्विधावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रतापसिंह जाधव यांनीही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी संजय मंडलिक यांना देण्यासंदर्भातील संकेत शरद पवार यांना दिले.

या साऱ्यांचा समाचार घेत माझ्या मनात काय चालले आहे ते पक्षातील सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती असतं, म्हणून योग्य वेळी निर्णय घेऊ असं पवारांनी सूचित केलं.