वर्धा : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. वर्ध्याच्या रमणा इथल्या विठ्ठल सोमनाथे यांच्याकडून एसबीआय क्रेडिट कार्डसाठी जुजबी माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे चोरट्यांनी सोमनाथे यांच्या बँक खात्यातील दोन लाख पाच हजार रुपये लुटले. सोमनाथे यांनी त्वरीत पोलिसांत तक्रार केली. विशेष म्हणजे सायबर सेलने तातडीने कारवाई करत सोमनाथे यांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले.

रमणा इथले शेतकरी विठ्ठल सोमनाथे यांनी महिनाभरापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड घेतले. त्यानंतर सोमनाथे यांना एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने एसबीआय क्रेडिट कार्डमधून बोलत असल्याचे सांगून सोमनाथे यांच्याकडून क्रेडिट कार्डसंबधीची इतर माहिती घेतली, तसेच त्यांच्याकडून ओटीपी (वन टाईम पासवर्ड) मिळवला. मिळालेल्या माहिती आणि ओटीपीच्या सहाय्याने लुटारुंनी सोमनाथे यांच्या बँक खात्यातील दोन लाख पाच हजार रुपयांचे तीन व्यवहार केले.

आपल्या बँक खात्यातील दोन लाख पाच हजार रुपये लंपास केल्याचे लक्षात येताच सोममाथे यांनी सायबर सेलशी संपर्क साधला. सायबर सेलनेदेखील त्यांची तांत्रिक कार्यकुशलता पणाला लावून दोन लाख पाच हजार रुपये परत मिळवले. त्यामुळे फसवणूक झालेले सोमानाथे आर्थिक भुर्दंडापासून वाचले.

मागील वर्षभरात 9 लाख रुपये परत मिळवण्यात सायबर सेलला यश मिळाले आहे. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी देऊ नये, तसेच बँक खात्यासंदर्भातील इतर माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लुटारुंचे फसवणुकीचे फंडे
लुटारु टोळ्या व्यक्ती व वयाप्रमाणे फसवणुकीचे फंडे बदलतात. पेन्शनचे, वयाचे व्हेरिफिकेशन आहे. नोकरिकरिता रेज्युमे शॉर्टलिस्ट झाला आहे, कोणत्याही ब्रँडची फ्रेन्चायजी द्यायची आहे. शॉपिंगच्या किंवा कॉस्मेटिकच्या ऑफर, शेतात मोबाईल टॉवर लावायचे आहे. तसेच आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचे आहे, अशी सर्वसाधारण पद्धत वापरली जात आहे.