मुंबई : राजेंचा नादच खुळा... कॉलर उडवणं असो किंवा त्यांच्यावर रचलेली गाणी असोत, पण कार्यकर्त्यांमध्ये रमणारा रावडी राजा लोकसभेत मात्र फेल झाला आहे. कारण सातारकरांनी त्यांना जिथे पाठवलं होतं, त्या लोकसभेत त्यांचा नंबर शेवटून पहिला आला आहे. सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे फक्त 27 टक्के दिवसच लोकसभेत हजर होते. त्यांनी एकाही चर्चेत भाग घेतला नाही आणि प्रश्नही विचारला नाही, त्यामुळे ते खालून पहिले आले आहेत.

अशोक चव्हाण
अर्थात राजेंनी जास्त वाईट वाटून घेऊ नये. कारण नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी तळात राहण्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांनी फक्त 42 टक्केच हजेरी नोंदवली आहे. 898 प्रश्न विचारत त्यांनी नऊ वेळा चर्चेतही भाग घेतला आहे.

प्रीतम मुंडे
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी फक्त 54 टक्के हजेरीसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. 449 प्रश्न आणि 32 चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या.

संजय जाधव
तळातून चौथ्या क्रमांकावर असलेले परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी 55 टक्के दिवस हजर राहत 280 प्रश्न विचारतानाच 21 चर्चांमध्ये भाग घेतला.

संजयकाका पाटील
पाचवा क्रमांक सांगलीच्या भाजप खासदार संजयकाका पाटलांनी मिळवला आहे. 56 टक्के दिवस ते सभागृहात गेले. तिथे 12 वेळा चर्चांमध्ये सहभागी होत त्यांनी 218 प्रश्न विचारले.



हे झालं तळातील खासदारांचं. पण महाराष्ट्रातून लोकसभेत गेलेल्या काही मोजक्याच खासदारांनी दमदार कामगिरीही केली आहे. पाच वर्षांनंतर राज्यातील लोकसभा खासदारांमध्ये ते देशात टॉपर ठरले आहेत.

अरविंद सावंत
टेलिफोन निगम कामगारांचे नेते दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत. त्यांनी फक्त दोन टक्के वेळा दांडी मारली आहे. तर तब्बल 98 टक्के दिवस ते लोकसभेत हजर होते. त्यांनी 478 प्रश्न विचारतानाच 286 वेळा चर्चेतही सहभाग घेतला.

किरीट सोमय्या
दुसऱ्या क्रमांकावर मुंबईकर किरीट सोमय्याच आहेत. ईशान्य मुंबईतील सोमय्यांनी 97 टक्के हजेरी 120 वेळा चर्चेत भाग घेतला आणि 472 प्रश्नही विचारले.

सुप्रिया सुळे
तिसऱ्या क्रमांकावर बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. 96 टक्के दिवस त्या सभागृहात होत्या. तब्बल 1176 प्रश्न विचारण्याचा विक्रम केला आहे. 149 वेळा चर्चेत सहभागी झालेल्या सुप्रिया सुळेंनी 22 खाजगी विधेयकेही सादर केली.

सुनील गायकवाड
लातूरच्या सुनील गायकवडांनी सुप्रियाताईंएवढीच 96 टक्के हजरी नोंदवली आहे. मात्र त्यांनी 681 प्रश्न विचारत 42 वेळा चर्चेत सहभाग घेतला असला तरी तो सुप्रिया सुळेंपेक्षा कमी असल्याने त्यांचा क्रमांक चौथा ठरला आहे.

राहुल शेवाळे
मुंबईकरांना असलेले वेळेचं महत्त्व मुंबईतील तिसऱ्या खासदारांनाही पहिल्या पाच जणांमध्ये पोहोचवणारं ठरलं आहे. 94 टक्के दिवस लोकसभेत हजर राहिलेल्या राहुल शेवाळेंनी 841 प्रश्न विचारले तर 208वेळा चर्चेत सहभाग घेतला होता.



महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक तसं लोकशाहीचं सौंदर्य दर्शवणारं आहे. अर्थात लोकसभेत खासदारांची कामगिरी तशी चांगली असली तरी त्यातून मतदारसंघासाठी काय मिळवलं त्यावर त्यांचा खरा निकाल ठरणार आहे.