मुंबई : शिवसेना-भाजप युतीसाठी जागावाटपाच्या वाटाघाटींना वेग आला आहे. तरी, स्वबळाचा ठराव करणारी सेना पुन्हा कुठल्या मुद्द्यावर युतीसाठी मागे येणार, ही सर्वात मोठी अडचण दिसत आहे. गेल्या चार वर्षांत भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडलेल्या शिवसेनेला आता पुन्हा निवडणुकीआधी युती करण्यासाठी ठोस कारण हवं आहे. यासाठी दोन पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरु असल्याची माहिती भाजप सूत्रांकडून मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकत्र आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र युतीची सुपारी फुटल्यानंतरच उद्धव आणि मोदींना एका व्यासपीठावर आणण्याचा मुहूर्त जुळून येण्याची चिन्हं आहेत.

आचारसंहिता लागण्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरु आहे. मोदींच्या मंचावर राजकीय कुरघोडी करण्याची संधी सेनेला मिळू नये, यासाठी युतीच्या सर्व वाटाघाटी पूर्ण करुनच एका मंचावर येण्याची अट केंद्रीय स्तरावरुन घालण्यात आली आहे.

शिवसेनेला सन्मानजनक वागणूक मिळाल्यास युतीच्या दिशेने सकारात्मक पावलं पडू शकतात. तसंच, बदलत्या परिस्थितीनुसार भाजपमधलं अंतर्गत राजकारण उफाळून आलंच, तर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून शिवसेनेकडून नितीन गडकरींच्या नावाला बिनशर्त पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे

कोणकोणत्या मुद्द्यांवर युतीचं पॅचअप शक्य?

- हिंदुत्व, राम मंदिर
- दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न
- मतविभाजन टाळणे
- सन्मानजनक वागणूक (म्हणजेच मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री पद, महत्वाची मंत्री पदं)
- पंतप्रधान पदाचा उमेदवार