मुंबई : आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी गर्दी केली. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरु आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी जमली आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत तर अनेक ठिकाणच्या मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.


साईबाबा मंदिरात सध्या तीन दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सव
शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या तीन दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सव सुरु आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईंच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. साईसंस्थाननं आज व्हीआयपी पास सेवा बंद केली आहे. दर्शनरांगांमध्येही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान दरवर्षी गुरुपौर्णिमेदिवशी रात्रभर सुरु असणारे साईमंदिर आज रात्री मात्र शेजआरतीनंतर साडेदहा ते उद्या पहाटे चार वाजेपर्यंत चंद्रग्रहणामुळे  बंद राहणार आहे.


शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी जमली
आज गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी जमली आहे. गजानन महाराजांना नमन करण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. दरवर्षी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शेगावी येत असतात.  गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूला नमन करून नवीन वर्षाची सुरुवात करावी हा उद्देश भाविकांच्या मनात असतो. त्यामुळे संतनगरी शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन करण्याकरता भाविकांची गर्दी होत असते. यावर्षीही या निमित्ताने मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नृसिंहवाडीचे दत्त मंदिर भाविकांनी फुलले
गुरुपौर्णिमेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीचे दत्त मंदिर भाविकांनी फुलून गेलं आहे. गुरुपौर्णिमे दिवशी श्री दत्ताचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासुन गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दत्त मंदिर दक्षिणद्वार सोहळ्यावेळी मंदिर पाण्याखाली गेले होते. मात्र या आठवड्यात पावसाचा जोर ओसरल्याने पाणी पातळी कमी होऊन मंदिर खुले झाले आहे. त्यामुळे भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन घेता येत आहे.



अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दखल
गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दखल झाले आहेत.  अक्कलकोटच्या मंदिरात दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात. मंदिराचे मुख्य पुजारी, चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार मोहन यांच्या हस्ते पहाटे गुरुपौर्णिमानिमित्त पाच वाजता काकड आरती पार पडली.  गुरुपौर्णिमानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल स्वामी मंदिरात पाहायला मिळाली.



पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात पार पडला संत-देव भेटीचा अनुपम सोहळा
आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलाचे अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची आज देवाच्या चरणाशी भेट झाली. देव आणि संत भेटीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी आज मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आषाढीसाठी आलेल्या संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत नामदेव , संत एकनाथ या सात पालखी सोहळ्यांना मानाच्या पालख्या म्हणून ओळखतात. हे सर्व संत वर्षात फक्त एकदाच आषाढ पोर्णिमेला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात.  वारकरी सांप्रदायात या संत-देव भेटीला फार महत्व असते. ज्या संतांचा जयजयकार सांप्रदाय आयुष्यभर करीत असतो त्या संतांची आज आपल्या लाडक्या विठुरायाशी भेट होत असते.

आज भल्या पहाटे सर्व पालखी सोहळे चंद्रभागा स्नान करुन हरिनामाच्या जयघोषात गोपाळपूर येथे जाऊन गोपाळकाल्याच्या आनंद घेतला. दही,  लाह्यांच्या काल्याचा प्रसाद गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरात दाखवून या काल्याच्या प्रसादाचे सर्वच भाविकांना वाटप करण्यात आले. तिथून या सर्व पालखी सोहळे एकापाठोपाठ एक विठ्ठल मंदिरात दाखल झाले.  सुरुवातीला संत एकनाथ महाराज आणि त्यापाठोपाठ संत निवृत्तीनाथ, संत नामदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांचे पालखी सोहळे मंदिरात दाखल झाले . या सर्व संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या आणि देवाची आणि या संतांची अनुपम भेट घडवून आणण्यात आली.

समर्थ रामदासांच्या जन्मगावी गुरुपौर्णिमा उत्सव
जालना जिल्ह्यातील जांब समर्थ या समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी आज गुरूपोर्णिमेनिमित्त  उत्सव पाहायला मिळाला. आज या उत्सवानिमित्त सकाळपासून समर्थ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब गावात समर्थांचा जन्म झाला होता. या ठिकाणी समर्थ मंदिरात आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात आला. त्या अगोदर सकाळी काकड आरतीनंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला. परंपरेप्रमाणे आज गुरूपोर्णिमेनिमित्त समर्थाच्या पालखीची देखील मिरवणूक काढण्यात आली.