Guru Paurnima 2022 : आज गुरुपौर्णिमा (Guru Purnima) अर्थातच आपल्या गुरुंना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक शिष्य या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. याच निमित्ताने महाराष्ट्रातही विविध गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जातेय. आपल्या गुरुंचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरात सकाळपासूनच भक्तांची भर पावसातही मोठी गर्दी झाली आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त कोणकोणत्या ठिकाणी भक्तांची गर्दी झाली आहे याचा आढावा घेऊयात.
शिर्डीतील साईबाबा मंदिर :
शिर्डीतील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला होता. यावर्षी साई बाबा मंदिर (Sai Baba Temple) भक्तांसाठी खुले असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आलेल्या भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. देश-विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई बाबांना भाविक गुरुस्वरुप मानतात. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं हिच भावना मनात ठेवून लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणाबरोबरच परराज्यातील अनेक पालख्या साई बाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीत दाखल झाल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक भाविक रात्रभर पायी प्रवास करत शिर्डीत दाखल झाले आहेत. आज सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक गुरुस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात आली. आजच्या दिवशी गुरुला भगवंत मानून गुरुंनी आपल्यावर केलेल्या उपकरातून उतराई होण्याचा आजचा दिवस आहे. साई बाबांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश जगभरात नेण्याचा संकल्प यावेळी अनेक भक्तांनी केल्याचं सांगितलं.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर :
गुरुपौर्णिमेनिमित्त आज विठ्ठल मंदिरात संत-देव भेटीचा अनुपम्य सोहळा पार पडला. सर्व मानाच्या पालख्यांनी विठ्ठल मंदिरात येऊन विठुरायाच्या चरणाचे दर्शन घेतले. आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलाचे अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची आज देवाच्या चरणाशी भेट झाली. देव आणि संत भेटीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी आज मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आषाढीसाठी आलेल्या संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत एकनाथ पालखी सोहळ्यांनी आज विठुरायाचे दर्शन घेतले. संपूर्ण वर्षभर केवळ एकदाच या संतांच्या पादुका गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेत असतात. आज भल्या पहाटे पादुकांच्या स्नान आणि नित्यपूजेनंतर सर्व मानाचे पालखी सोहळे गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे पोचले. येथील गोपाळकृष्णाच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला केल्यावर हे सर्व मानाचे पालखी सोहळे देवाच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिराकडे आले.
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर :
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शेकडो भाविक दखल झाले आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येने अक्कलकोट येथे असतात. पहाटे साडे पाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी मंदार मोहन यांच्या हस्ते काकड आरती पार पडली. त्यानंतर महाराजांच्या दर्शनसाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. अगदी पहाटे पासूनच लोक रांगा लावून दर्शनसाठी उभे होते. अक्कलकोटमध्ये रात्री पासूनच पावसाची संततधार सुरूच आहे. मात्र पावसात देखील नागरिकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात महानैवैद्य स्वामी मंदिरात नेण्यात आला. मागील आठवडाभर गुरुपौर्णिमाचा उत्सव अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतोय. त्यामुळे अनेक भक्तगण याच ठिकाणी निवासी आहेत. आज दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल स्वामी मंदिरात पाहायला मिळाली.
जळगाव जिल्ह्यातील महर्षी व्यास मंदिर :
भारतात काशीनंतर महत्त्वाचे असे व्यासभूमी म्हणून ओळखले जाणारे आणि भाविकांचे नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून जळगाव जिल्ह्यातील यावल येथील महर्षी व्यास मंदिर मानले जाते. महर्षी व्यासांच्या तपोभूमीचे हे भारतातील एकमेव पवित्र क्षेत्र आहे. आणि त्यामुळेच या स्थानाला महात्म्य प्राप्त झाले आहे. गुरूंचे गुरू म्हणून महर्षी व्यास ऋषी यांच्याकडे पाहिले जात असल्याने गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने पूजनाचा अर्थात गुरुपौर्णिमेचा भर पावसात देखील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळाले आहे. यावल शहरातील ब्राह्मणवृंदाच्या उपस्थित महर्षी व्यास महाराजांची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त व्यास मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. मागील दोन वर्षांचा कोरोणाचा काळ पाहता या ठिकाणी मंदिर बंद असल्याने भाविकांना निराशेचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र कोरोणाचे निर्बंध नसल्याने हजारो भाविकांनी पाऊस असताना ही मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी गर्दी केली असल्याचं आज पाहायला मिळाले आहे
महत्वाच्या बातम्या :