Maharashtra Rain Updates: मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे. अशीच एक घटना चंद्रपुरात समोर आली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका बसमधील 35 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. स्थानिकांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले असते. 


चंद्रपूर येथील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात बस अडकली होती. या बसमध्ये 35 प्रवासी होते. पुराच्या पाण्यात बस अडकल्याची माहिती विरुर पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाडसी कामगिरी करत प्रवाशांची सुटका केली. पुराच्या पाण्यात अडकलेली बस मध्यपदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बस चालकाला स्थानिक पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितले होते. मात्र, तरीदेखील बस चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत बस पुढे नेली. त्यानंतर पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही बस पुराच्या पाण्यात बंद पडली. भर पुराच्या पाण्यात बस बंद पडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होती. पुराच्या पाण्यात बसचा अर्धा भाग बुडाला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 


पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसची माहिती विरुर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. विरूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पहाटेच्या अंधारात बचाव कार्य सुरू केले. पोलिसांच्या मदतीला स्थानिकही धावून आले होते. स्थानिकांच्या मदतीने पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतानादेखील बचाव कार्य सुरू करण्यात आले. दोऱ्या बांधून बसमधील पुरुष, वृद्ध, लहान मुले व महिला यांची सुखरुपपणे सुटका केली. या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून त्यांना हैदराबादच्या दिशेने रवाना करण्यात आले. चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सध्या कौतुक होत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: