Gunratna Sadavarte Remanded in Police Custody for 4 Days : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आधीच सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 


दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे. काल मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता. संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. काल रात्री उशिरा त्यांना सातारा येथे आणलं गेलं. त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 


पवरांच्या घरासमोरी आंदोलनानंतर सदावर्तेंवर गुन्हा दाखल 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या आंदोलनाप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटानं शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी थेट पवारांच्या घराच्या परिसरात शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पलफेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्यानं पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.