Deepak Pandey : महसूल विभागावर लेटर बॉम्ब टाकणारे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे  यांच्या आणखी एका पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पांडे यांनी हेल्मेट सक्तीच्या नियमाची राज्यभर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जे पेट्रोलपंप चालक विना हेल्मेट असणाऱ्यांना पेट्रोल देतात त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्याची विनंती देखील पांडे यांनी या पत्रात केली आहे.


राज्यभर 2016 पासून राज्यभर हेल्मेटसक्ती लागू असल्याने राज्यभर हा नियम लागू करण्याची मागणी पांडे यांनी केली आहे. नशिकमध्येच या निर्णयाला विरोध असल्याने राज्यभर गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळाली तर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मागच्या काही दिवसापूर्वी महसूल विभागाच्या संदर्भात पोलीस महासंचालकाना पत्र लिहिले होते. त्यांच्या या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीतही उमटले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीमंडळ बैठकीत हे पत्र वाचून दाखवले होते. पोलीस अधिकाऱ्यांना असं पत्र लिहिण्याचा अधिकार कोणी दिला असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटरसारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून, तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सर्वसामान्य नागरिकांचा छळ करुन वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा आता पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकाना पत्र लिहल्याने खळबळ उडाली आहे.
 
नाशिक पॅटर्न राज्यभर लागू करा


दरम्यान, नाशिक शहरात होर्डिंग लावण्याआधी पोलीस परवानगी घेणे सक्तीचे करावे हा नियम राज्यभर लागू करण्याची मागणीही पांडे यांनी केली आहे. नुकतीच मुंबईत वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत पांडे यांनी ही मागणी केली आहे. पोलीस परवानगी बंधनकारक असल्याने शहर होर्डिंगमुक्त झाल्याचा पोलीस आयुक्तांनी यावेळी दावा केला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नाशिक पॅटर्न राज्यभर लागू करण्याची विनंती देखील पांडे यांनी केली आहे. आक्षेपार्ह होर्डिंग, बॅनरवरुन होणारे वाद टाळण्यासाठी नाशिकमध्ये होर्डिंग लावण्याआधी पोलिसांकडून मजकूर तपासून परवानगी दिली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: